top of page

बाबा...

Yash Potdar

बाबा...

बाबा... 

  

आज काहीसे ऐसे झाले, 

नकळत डोळे भरुनी आले, 

आजपरीस जे दिसले नाही, 

क्षणात सारे ऐकू आले... 

  

रांगण्याच्या वयात माझ्या, 

चालण्याचे हट्ट झाले, 

पहिली थाप पडली त्याची, 

अन् धावण्याचे सूत्र आले... 

  

हट्ट सारे पुरे झाले, 

साऱ्या  सुखांची सोय झाली, 

उपाशी पोटी झोपला तो, 

परी अश्रू त्याचे दिसले नाही... 

  

झटला तो रात्रंदिन, 

परी किंमत त्याची कळली नाही, 

आईइतकेच प्रेम तयाचे, 

तरी ती जागा त्यास मिळाली नाही... 

  

कठोरताच दिसली त्याची, 

प्रेम तयाचे नाही हो, 

नकळत अंतर वाढत गेले, 

कळले मलाच नाही हो... 

  

आज अचानक जाणवले हे, 

पाहता शांत चेहरा तो, 

मीच तयाची काठी आता, 

दमला माझा बाबा तो... 

  

                               -यश पोतदार 

bottom of page