top of page

कुंकू

Priya Potdar

कुंकू

संक्रांत आली म्हंटल की ठिकठिकाणी हळदीकुंकवाचे कार्यक्रम, नविन लग्न झालेल्या मुलींचे संक्रांतसण अगदी थाटात साजरे केले जातात. काय गंमत आहे ना, इवलंस कुंकू असतं, ४–६ बोटं रुंदीच्या कपाळावर दोन

भुवयांच्या मधे, पण या छोट्याशा जागेत सुद्धा स्त्री आपल्या कुंकवाचा काटेकोरपणे सांभाळ करते. कुंकवाची जागा जराशी सरकली तरी तिचे पूर्ण व्यक्तिमत्व बदलते, इतके कुंकवाचे स्थान अढळ. असे हे कुंकू ती शेकडो वर्षे भारतीय संस्कृतीचा ठेवा म्हणून जपत आली आहे.

कुंकवाच्या रंगात, आकारात जरी विविधता असली तरी कुंकू हे अस्सल भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. या संस्कृतीला इतिहास आहे, एक वैदिक परंपरा आहे. युद्धभुमीवर निघताना पूर्वीच काय आजही कुंकूमतीलक लावला जातो तो यशाची कामना करूनच. हिंदू संस्कृतीत होणाऱ्या प्रत्येक संस्कारात कुंकवाचे अस्तित्व महत्वाचे आहे. अगदी दारातल्या रोजच्या रांगोळी पासून सुरू होणारा त्याचा गृहप्रवेश, पूजा, बारसे, वाढदिवस, लग्नं इथपर्यंत मानाचे स्थान मिळवतो.

‘कुंकवाचा धनी’ असं म्हंटल्या बरोबर एक ठसठशीत कुंकू लावलेल, नऊवारी साडीतल,`मराठमोळ्या स्त्रीचे व्यक्तिमत्व आणि तिचा आडदांड झुपकेदार मिशा असलेला ‘धनी’ हे चित्र डोळ्यासमोर उभं राहते. सौभाग्यवतीला एकदा पतीच्या नावाने कुंकू लागले की तिचे स्वतःचे असे वेगळेपण संपते, असा एक समज, कारण नंतर ‘सौभाग्य’ व ‘ती’ असं तिचं स्वरूप होतं. थोडासा दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला तर कपाळावर लावलेल्या त्या कुंकवाची ती स्त्री स्वतःच ‘धनी’ असते

असे नाही वाटत?

प्रियदर्शनी पोतदार

bottom of page