एक पाऊस असाही, तुझ्याविना भिजलेला,
एक पाऊस असाही, तू असूनह ी नसलेला,
एक पाऊस असाही, तुझ्यासाठी मागितलेला,
जसा तू मला अन् मी तुला रंगवून सांगितलेला...
रंगवलेला मनातला पाऊस, आज अवचित बरसला,
मिठीतल्या खुल्या क्षणांचा मेघ, पुन्हा गरजला,
त्या गरजत्या मेघाला पाहून, तू मात्र घाबरलीस,
पटकन् मिठीत शिरून, लाजत लाजत सावरलीस...
तुझं ते लाजणं पाहून, पाऊस अजून उधळला,
अन् माझ्या प्रेमाशी शर्यत करत, धो धो कोसळला...
दोघे मात्र चिंब होतो,
त्या क्षणात धुंद होतो,
वाटलं की हे असेच राहावे,
मनात गच्च भरून ठेवावे...
त्या दिवशी मात्र हातातून हात सुटत नव्हता,
डोळेच इतकं बोलत होते, की तोंडातून एक शब्द फुटत नव्हता...
किती गं आठवणी देतो हा पाऊस,
पुरता पुरत नाही मनाची ही हौस,
मनाचा विचार करता, क्षणात हे जाणवले,
ती आहे खूप दूर, अन् डोळे हलकेच पाणावले...
एक पाऊस असाही, तुझ्याविना भिजलेला,
एक पाऊस असाही, तू असूनही नसलेला...
यश पोतदार

