ढग-डॅश अर्थात मेघदूत
आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. “आषाढस्य प्रथम दिवसे” म्हटले की आठवते ते महाकवी कालीदासाचे अजरामर महाकाव्य “मेघदूत”. अर्थात ते संस्कृतमध्ये असल्याने काही मोजक्या सुसंस्कृत लोकांना सोडल्यास कोणीच ते वाचलेले नसते. अहो, वृत्तपत्रातील वृत्ते म्हणजे बातम्या न वाचणाऱ्या पिढीने “मंदाक्रांता” वृत्तातील छंदकाव्य वाचावे अशी अपेक्षा तरी कशी करणार?
त्यांना फार तर मंदा आणि कांता ही दोन बहिणींची नावे आहेत असे वाटेल. शिवाय सध्या मराठी व इंग्रजी सोडल्यास इतर काही भाषेतले वाचायचे नाही असा राजकीय सूर महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कोणी संस्कृत वाचायची सुतराम शक्यता दिसत नाही. म्हणूनच कालिदासाचा भाच्चा ह्या नात्याने मी आजच्या पिढीला कळेल, अशी मेघदूताची गोष्ट “ढग-डॅश” ह्या नावाने नव्या स्वरुपात मॉडर्न मराठीतून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
आता काही जाणते म्हणतील “तू कालिदासाचा भाच्चा कसा? कालिदास तर शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेले.” तर त्याचे उत्तर असे की अशोक सराफ ह्यांना जशी संपूर्ण नट जमात मामा म्हणते, तसेच आम्ही यमकांची जुळवाजुळव करुन स्वतःला कवी समजणारे लोक कालिदासाला मामा समजतो. ह्यात तुम्हाला मामा बनवायचा अजिबात प्रयत्न नाही. असो, आता मेघदूताकडे- माफ करा - ढगडॅशकडे वळूया.
ढग-डॅश हे विप्रलम्भ शृंगारकाव्य आहे. आता तुम्ही म्हणाल “हे, विप्रलम्भ म्हणजे काय रे, भाऊ?” तर आपला “डाव” म्हणजे प्रियकर वा प्रेयसी दूर कुठेतरी असल्याने मनात प्रेम आणि व िरह ह्या दोन्ही भावना एकदम उचंबळून आल्या, थोडक्यात म्हणजे, अरिजीत सिंगची गाणी ऐकाविशी वाटायला लागली की विप्रलम्भ शृंगार होतो. “अश्विनी, ये ना, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं...” हे गाणे गेल्या शतकातले विप्रलम्भ शृंगारकाव्य आहे. आताच्या काळातले उदाहरण द्यायचे तर “मेले बाबूने खाना खाया?” किंवा “I miss you, baby” ही वाक्ये विप्रलम्भ शृंगाराने भरलेली आहेत.
ढग-डॅशची गोष्ट अगदी सरळसोपी आहे, पण कालिदासांना specialization हा शब्द माहीत नसल्याने, लवस्टोरी, ट्रॅव्हलव्लौग आणि रिअल इस्टेट रिव्ह्यू असे अनेक प्रकार ह्या एकाच काव्यरुपी post मध्ये include केले आहेत. रुकी मिस्टेक. कैलासपर्वताच्या पल्याड म्हणजे आताच्या चीनमध्ये अलकानगरी नावाच्या गावात कुबेर नावाचा अधिकारी असतो. त्याच्या एका subordinate यक्षाकडून कामात चूक होते. चीनमध्ये कामगारांना फारसे हक्क नसल्याने कुबेर त्या यक्षाला punishment posting म्हणून नागपूरला रामगिरी पर्वतावर एका वर्षासाठी पाठवतो. (पुरातन काळापासून punishment posting ही विदर्भातच होते ह्याची गरजूंनी नोंद घ्यावी). नागपूरच्या उन्हाळ्याला कावलेल्या आणि बायकोपासून आठ महिने दूर राहिल्याने, विरहाने तळमळणाऱ्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी एक ढग दिसतो आणि त्या काळात WhatsApp, Texting वगैरे नसल्याने, ह्या ढगामार्फत तो आपल्या बायकोला मेसेज पाठवतो, एवढीच ह्या ढग-डॅशची गोष्ट. पण बहुदा OTT ला आठ एपिसोड लागतातच तसे प्रकाशकाने minimum श्लोकांच्या घातलेल्या अटींमुळे कालिदासाना ह्या काव्यात भारतीय संस्कृतीचे विविध पैलू दाखवायला लागले असावेत.
ढगाकडून मेसेज पाठवायचा तर डिलिवरी चार्जेसशिवाय तो मेसेज डिलिवर करणार नाही हे ठाऊक असल्याने यक्ष त्याला फुलांची भेट देतो. पण त्याकाळात GPS नसल्यामुळे निरोप नक्की कुठे नेऊन द्यायचा हे कसे कळणार? इथेच यक्षाचा ट्रॅव्हलव्लौग सरु होतो. रामगिरीवरून सुरु होऊन विदिशा, उज्जैन, जयपूर, कर्नाल, कुरक्षेत्र व हरिद्वारमार्गे शेवटी कैलासपर्वत ओलांडून अलकानगरीला पोचण्याचा हा प्रवास हजार किलोमीटरचा असला तरी किती रमणीय म्हणजे instagrammable आहे, ह्याचे वर्णन यक्ष करतो. दमलास तर विंध्य व हिमालय पर्वतावरील एखाद्या रिसॉर्टमध्ये रहायचा सल्लाही देतो. स्वतः प्रेमविरहाने व्याकूळ झालेला यक्ष, ढगदेखील शृंगाराने प्रेरित होईल असे समजून त्याला मार्गातील अनेक नद्यांशी शृंगारलीला म्हणजे आजच्या स्लॅंगमध्ये Rizzy करायचे आमिष दाखवतो.
ह्यानंतर यक्ष अलकानगरीचे मार्केटिंग व रिअल इस्टेट रिव्ह्यू सुरु करतो. सुंदर स्त्रिया, पैशांनी लोडेड यक्ष आणि कल्पवृक्षाकडून मिळणाऱ्या “रतिफल” नावाच्या मद्याची रेलचेल, ही अलकानगरीची वैशिष्ट्ये. रोजच पौर्णिमा असलेल्या अलकानगरीत डोळ्यांत अश्रूही येतात, ते फक्त आनंदाचेच. अश्या नगरात यक्षाचा सप्तरंगी कमान असलेला पाचूचा महाल आहे. दारी वृक्ष आहेत, कारंजे आहे, रत्नांनी मढवलेले खेळांगण आहे. महालाच्या सौंदर्याचे humble bragging करताना, आपण नसल्याने महालाची स्थिती फारशी ठीक राहीली नसल्याचेही यक्ष सांगतो.
आता यक्षाची विरहयातना पुन्हा जागृत होते. आपल्या विरहामुळे एकाकी असलेल्या, रडून डोळे सुजलेल्या , मळके कपडे घातलेल्या आणि खंगलेल्या आपल्या बायकोला आपली खुशाली कळवायला तो सांगतो. “Every time in my dream I see you, I feel you.", म्हणजे, "मला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तूच दिसते आहेस. चार महिन्यांनी मी परत येईन आणि शरदीय चांदण्यात आपले मीलनाचे मनोरथ पूर्ण होईल”, असा निरोप बायकोला देऊन तिची खुशाली व तिचा माझ्यासाठी संदेश घेऊन त्वरित परत निघ, अशी याचना यक्ष ढगाकडे करतो. चातकांच्या इच्छा त्यांनी न मागताही पूर्ण करणारा ढग, आपल्या विनंतीचा नक्कीच मान ठेवेल हा विश्वास यक्षाला आहे. फुलांच्या रूपातील डिलिवरी चार्जेस व्यतिरिक्त, एक्स्ट्रा टीप म्हणून यक्षाने ढगाला दिलेल्या “तुझे सौंदर्य व ऐश्वर्य सदैव वाढत राहो. तुझी आणि तुझी पत्नी वीज हिची ताटातूट कधीही न होवो”, अश्या आशीर्वादाने ढगडॅशचा शेवट होतो.
जर गोष्ट इंटरेस्टींग वाटली तर मूळ मेघदूत काव्याच्या भाव सौंदर्याचा, नाद सौंदर्याचा, उपमा सौंदर्याचा नक्की आस्वाद घ्या. संस्कृत काव्य कळले नाही तरी त्या शब्दांच्या उच्चाराने मन किती अंतर्संगीतात मग्न होते हे एकदा तरी अनुभवा. भारतीय संस्कृतीचे खरे स्वरूप तुम्हाला त्यातून नक्की जाणवेल.
जय मसुरेकर

