असेन मी ५वी/६वीत तेव्हाची गोष्ट. आम्ही ३/४ मैत्रिणी सायकल वरून एकत्र शाळेत जात असू आणि येत असू. शाळेत जाताना मधे रेल्वे क्रॉसिंग लागत असे. बरेचदा रेल्वे जाणार असायची म्हणून गेट बंद आणि दोन्ही बाजूंना गाड्यांच्या रांगा असा सीन असायचा. पण तो दिवस मात्र वेगळाच उजाडला होता. नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता आम्ही रेल्वे क्रॉसिंग ला पोचल्यावर दोन्ही बाजूंऐवजी एकाच बाजूला ही तोबा गर्दी पाहिली. कुतुहलापोटी आम्हीही सायकलींसकट घुसलो त्यात. पाहिले तर कुणाचातरी खून करून प्रेत रुळांवर टाकलं होतं, हात कापले होते. खरंतर फारच भयानक दृश्य होतं हे, आम्ही अमेरिकेत असतो तर शाळेत काऊंसेलिंग वगैरे केलं असतं कदाचित मनावर खोल परिणाम होऊ नये म्हणून. पण आ म्ही नेहमीप्रमाणे शाळा उरकली आणि परत घरी निघालो.
दुपारी परत जाताना माझ्यातला सुजाण नागरिक जागा झाला असावा बहुदा. मैत्रिणींना म्हणलं आपण वाटेतच असलेल्या रेल्वे पोलिसांना सांगूया चला (जणू ते सकाळपासून ह्या सुजाण नागरिकाची वाटच बघत हातावर हात धरून बसले होते). मैत्रिणी भितीने नको बाई म्हणून बाहेरच थांबल्या आणि अस्मादिकांनी निधड्या छातीने आत जाऊन पोलिसांना इत्थंभूत माहिती पुरवली. त्यांनीही कौतुकाने सगळं ऐकून घेतलं. माझं नाव, कुणाची मुलगी, कितवीत शिकते इ. माहिती माझ्याकडून घेतली. डॉ. आपटे म्हणल्यावर निम्मं पंढरपूर त्यांचं पेशंट, रेल्वे मधले पण बरेच लोक ह्यात. त्यामुळे त्यांची मुलगी म्हणून त्यांनी ऐकून घेतलं असावं कदाचित.

घरी येऊन आई बाबांना माझ्या कर्तृत्वाचा रिपोर्ट दिला आणि जेऊन अभ्यासाला बसले. बाबांनी ऑपरेशन च्या दरम्यान कौतुकाने डॉक्टर मित्रवर्गालाही सांगितलं असावं. घरातले म्हणले आता तू पोलिसात रिपोर्ट केलाच आहेस तर चोरांना पकडल्यावर कोर्टात साक्षीला तुला बोलावतील बरंका त्यामुळे सगळे छोटे मोठे बारकावे नीट लक्षात ठेव (हे चेष्टेत असावं). त्यावरून माझ्या ताईने री ओढली की हो केतकी तुला कोर्टात बोलावणार आणि हे चोर खुनी लोक इतके वाईट असतात की तुरुंगातून सुटले की तुला शोधत येणार बदला घ्यायला.
हे म्हणजे चोराच्या उलट्या.... असं झालं की. माझ्या बालमनाने हा विचारच केला नव्हता, झाली का पंचाईत. आता मात्र माझ्यातला शूरवीर मावळा गलितगात्र झाला. अजून एकदोन जणांनी हा मुद्दा मांडला (बाबांच्या डॉ मित्रवर्गात आमच्या शौर्याची बातमी पसरली होतीच, कॉफीच्या निमित्ताने घरी आल्यावर मला घाबरवायचा सगळ्यानी प्लॅन केला असावा) आणि माझी पुरती घाबरगुंडी उडाली.
अन्नपाणी गोड लागेना, खरंच हो. बरं घरी ही अवस्था सांगावी तरी पंचाईत, नस्ते उद्योग कुणी करायला सांगितले होते हे ऐकून घ्यावं लागलं असतं. अक्षरशः महिनाभर मी अशा अवस्थेत होते. दिवसा शाळेत जाताना वाटायचं हे चोर सुटले तर नसतील ना तुरूंगातून, मला शोधत तर नसतील ना आणि रात्री जिन्यात पावलं वाजली की वाटायचं सापडलं त्यांना माझं घर, आजची रात्र शेवटची.
पण म्हणतात ना काळ हेच औषध असतं. आणि "पोलीस असं माहीतगाराचं नाव गुन्हेगारांना सांगत नसतात, लहान मुलांचं तर मुळीच नाही" व गैरे आई/बाबांकडून कळल्यावर माझी भिती थोडी थोडी कमी होत एक दीड महिन्याने ओसरली. आणि तोवर चोरही माझ्या मार्गावर नसल्याची खात्री पटली, नाहीतर एव्हाना पकडलंच असतं नाही का.
तर सरतेशेवटी साधारण 2 महिन्यांनी माझी भीती पूर्णपणे नाहीशी होऊन, 'नाही त्या गोष्टीत नाक न खुपसण्याचा' मनोमन निश्चय करून मी माझा नेहमीचा (पण वयाला शोभेलसा) चोंबडेपणा करायला रिकामी झाले.
-- केतकी अलुरकर