top of page

अध्यक्षीय

श्री. अभिजीत कुलकर्णी

अध्यक्षीय

धुरा हाती घेताना...


नमस्कार मंडळी!

सर्वप्रथम, या मंडळाच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार!

५० वर्षांची दैदीप्यमान परंपरा लाभलेल्या या मंडळाचे अध्यक्षपद भूषवताना मला सार्थ अभिमान आणि जबाबदारीची जाणीव, अशा संमिश्र भावना एकाच वेळी जाणवत आहेत.


ही महत्त्वाची धुरा सांभाळण्यासाठी मला या वर्षी एक नवीन कार्यकारिणी आणि उत्साही कार्यकर्त्यांची फळी लाभली आहे. हे तरुण कार्यकर्ते आपल्यासोबत नवनवीन कल्पना आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेऊन आले आहेत. या वर्षी आपण शिवजयंती वक्तृत्व स्पर्धा, वारी, मंगळागौर यांसारखे अनेक नवीन उपक्रम पहिल्यांदाच राबवणार आहोत. तुमच्या सक्रिय सहभागामुळे हे कार्यक्रम यशस्वी होतील आणि भविष्यात आपल्या मंडळाची एक नवी परंपरा बनतील, असा मला विश्वास आहे.


आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, आपल्या मंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक सभासदांनी अत्यंत उदार अंतःकरणाने मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या दातृत्वामुळेच आपल्याला दर्जेदार कार्यक्रम आयोजित करणे शक्य होत आहे. मी सर्व देणगीदारांचे विशेष आभार मानतो.


कोणताही मोठा सोहळा आयोजित करताना मला अनुभवी मंडळींचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची साथ भरभरून मिळत आहे, ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. भविष्यात आपण सर्व मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सांस्कृतिक वारसा जोपासूया आणि तो आनंदाने साजरा करूया.

आजवर अनेक दिग्गजांनी 'ईशान्य ओहायो' मराठी मंडळाची ही कीर्ती पताका अभिमानाने फडकवत ठेवली आहे. तोच वारसा पुढे नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. अशा प्रतिष्ठित मंडळाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मला मिळाला, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि या पदाला पूर्ण न्याय देण्याचे आश्वासन देतो.


धन्यवाद!


आपला नम्र,

अभिजीत कुलकर्णी

अध्यक्ष - २०२६, ईशान्य ओहायो मराठी मंडळ

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page