top of page

आमची मुंबई, आपली पावभाजी...

सौ. आरती स्वप्नील पगारे

आमची मुंबई, आपली पावभाजी...

मी पावभाजी बनवायला लहानाची मोठी होताना मुंबईत शिकले, असं शहर जिथे Street Food हे फक्त अन्न नाही तर प्रत्येक मुंबईकराच्या मनाची छेडली जाणारी एक भावानिक तार आहे. पावभाजी बनवायला मी कुठल्या पाककृतीच्या पुस्तकातून नाही शिकले, तर कळत नकळतपणे अनेकदा घरात खास दिवशी बनताना आणि अगणितवेळा शहराच्या वेगवेगळ्या पावभाजीच्या गाड्यांवर खाताना आणि माझ्या ऑर्डरची वाट पाहता पाहता समोर बनताना शिकले.


मुंबईत पावभाजी सगळीकडे आहे. समुद्र चौपाटयांपासून कुठल्याही शहरातल्या रात्रंदिवस चालू असलेल्या हातगाडयांपर्यंत. त्यांचं ते खास प्रकारे तवा चालवणं, ती भाजी एकजीव करणं, कुठल्याही मोजमापाशिवाय अंदाजाने ते मसाले भुरकणं आणि मनसोक्त असं त्या भाजीवर भरपूर असं बटर सोडणं मनावर छापच पाडून जातं. अश्याच वर्षानुवर्षांत पाहत आणि शिकत आलेल्या वेगवेगळ्या पाककलांच्या छटा माझ्याही पाककृतीत हळूहळू उमटत गेल्या.


घरात कधीच पावभाजीची ठरलेली अशी एक रेसिपी नव्हती, की ती 'अशीच' झाली पाहिजे, फक्त ती करतानाच्या भावना महत्वाच्या असल्या पाहिजेत. मुळात पावभाजी करायची म्हटली, की घरात आहेत नाहीत तितक्या सगळ्या भाज्या काढायच्या, त्या भाज्यांच्या आपापल्या स्वादानुसार मसाले थोडे वर खाली करायचे आणि यथेच्छ बटर, भरपूर कोथिंबीर आणि लिंबाने शेवटचा एक मास्टरस्ट्रोक मारायचा. इतकी वर्षं झाली, मी अजूनही याच प्रकारे पावभाजी करते, ज्यात थोडी Street-Style चव आहे आणि थोडासा पण गरजेचा असा घरगुतीपणा पण आहे.


या सगळ्यात महत्वाचा आहे तो पाव भाजी मसाला. बाहेर बऱ्याच ब्रँडचे मिळत जरी असले, तरी घरी हा मसाला कसा करायचा हे सांगते. कारण घरी केलेला मसाला आपल्याला आपल्या गरजेनुसार संतुलित ठेवता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ताजा असतो आणि दीर्घकाळ टीकतोही.


सामग्री:


२ टी स्पून धणे

१ टी स्पून जिरे

८-१० काश्मिरी लाल मिरच्या (गरजेनुसार त्यातच काही बेडग्या मिरच्याही घालू शकता, तिखटपणासाठी, एकूण ८-१०)

१ टी स्पून मिरे

१ टी स्पून लवंगा

१ लहान दालचिनीचा तुकडा

१ टी स्पून बडीशेप

१ टी स्पून आमचूर पावडर (नंतर घालायला)

१/२ टी स्पून हळद (नंतर घालायला)



कृती:


१. आमचूर पावडर व हळद सोडून वरील सर्व मसाले मंद आचेवर तव्यावर कोरडे भाजून घ्या, जोवर त्यांचा खमंग वास सुटत नाही. (Dry Roast them)

२. या भाजलेल्या मसाल्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या.

३. मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्या.

४. आता हळद व आमचूर पावडर या मिश्रणात घाला व या मसाल्याला एकजीव करून घ्या.

५. एखाद्या सुंदर अश्या Air Tight डब्यात हा मसाला ठेऊन द्या.


मनमुग्ध सुगंधासाठी १ ते २ महिन्यांमध्ये हा मसाला वापरल्यास उत्तम.


सौ. आरती स्वप्नील पगारे

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page