top of page

लेखणीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा

डॉ. भालचंद्र कुलकर्णी

लेखणीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा... वर आधारित



खुलासा:

ह्या सभेत सर्व प्राणी पात्रे काल्पनिक असून कोणत्याही प्राण्याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.



लेखणीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा

लेखणीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा

पोपट करी उचापती मधोमध उभा

पोपट करी उचापती मधोमध उभा


पोपट म्हणाला... पोपट म्हणाला...

मित्रांनो... देवाघरची सूट..देवाघरची सूट..

लेखणी दिलीय सर्वांना आता लिहा बेछूट


या लेखणीने लिहाल काय?

या लेखणीने लिहाल काय?


गाय म्हणाली...

गाय म्हणाली... कविता अश्शा

लेखणीने बघा मी करीन कश्शा!


खेचर म्हणाले...

खेचर म्हणाले...ध्यानात धरीन ध्यानात धरीन

मीही माझ्या लेखणीने असेच करीन असेच करीन

मी पण कविता वृत्तात लिहीन.

आणि नाहीच जमले तर?....

आणि नाहीच जमले तर मग वृत्तांत लिहीन!


कुत्रा म्हणाला...

कुत्रा म्हणाला... हलवून शेपटी

ईमान पाळीन मी ईमान पाळीन..

लिहिताना बिलकुल टीका टाळीन


मांजरी म्हणाली...

मांजरी म्हणाली... नाही ग बाई

कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही

खूप खूप रागवीन

गुरकाविन फिसकारीन ओचकारींन

सौ चुहे खाईन अन् हजला लिहीन


घोडा म्हणाला...

घोडा म्हणाला..‌.लावलित झापडे

आपल्याला नाही बाबा झेपायचे लफडे

तोंडाला लावलेत चण्याचे तोबरे

जायचो लिहायला अन् व्हायचे खोबरे!


घुबड म्हणाले...

घुबड म्हणाले... नाईट मारीन नाईट मारीन

(लेखणीने...)

अज्ञान दूर सारीन नि तुम्हां सर्वां तारिन


माकड म्हणाले...

माकड म्हणाले... ढील द्या थोडी

ढील दिलीत तर करीन कुरघोडी

हातात तुम्हीच माझ्या.. दिलेत कोलीत

लेखणीचे माझ्या आता.. मिळेल फलित


झेब्रा म्हणाला...

झेब्रा म्हणाला...शाब्बास पठ्ठे

बघताय ना हे अंगावर काळे पांढरे पट्टे

पांढऱ्यावर काळे करुन...काढतोच मी उट्टे


लांडगा म्हणाला...

लांडगा म्हणाला... पांघरून मस्त

कातडे मी शेळीचे केल्या किती फस्त

पुन्हा देशांतर... अर्र... वेशांतर करीन

लेखणीने फक्कड भाषांतर करीन


कोल्हा म्हणाला..

कोल्हा म्हणाला...द्राक्ष होती आंबट

लिहतो आता कादंबरी लांबटच्या लांबट


मासा म्हणाला...

मासा म्हणाला... टाकुन पहा गळ

लेख लिहिणे माझ्या डाव्या हाताचा मळ

लेखणी दिलीत हातात तर लिहीन दिनरात


बगळा म्हणाला..

बगळा म्हणाला..लावलंय ध्यान

हल्ली मी लेखणी केली आहे म्यान


मोर म्हणाला...

मोर म्हणाला...

कीस कीस काढून ताणून मी धरीन

कीस कीस काढून ताणून मी धरीन

(तुम्हां सगळ्यास) जाच मी करीन जाच मी करीन

(नंगा) नाच मी करीन नाच मी करीन


कांगारू म्हणाले

कांगारू म्हणाले माझे काय

तुझे काय हा हा हा

तुझ्यामुळेच त्यांनी खाल्ली हाय!


तेवढ्यात आला वाघ त्याला आला होता राग

वाघ म्हणाला...

वाघ म्हणाला...लिहिताय काय

असले चाळे तुमचे मला खपायचे नाय

फाडा लगेच सगळे आणि ताबडतोब जाळा

पेटले जेव्हा लिखाण साऱ्यां पाणी आले डोळा


बघितली आग... अन् घाबरला ना वाघ


वाघ पळाला...

वाघ पळाला...शेपूट घालून पायात

लेखणी मात्र आहे टिकून आजतागायात

शब्द जरी जाळलेत तरी धुरानेच पोळते

लेखणीची ताकद अशी जगा कळते...



सोबत ओरिजनल गाणे...


शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा

पोपट होता सभापती मधोमध उभा

पोपट होता सभापती मधोमध उभा


पोपट म्हणाला पोपट म्हणाला

मित्रांनो देवाघरची लूट देवाघरची लूट

तुम्हां आम्हां सर्वांना एक एक शेपूट

या शेपटाचे कराल काय

या शेपटाचे कराल काय


गाय म्हणाली गाय म्हणाली

अश्शा अश्शा शेपटीने मी वारीन माश्या

गाय म्हणाली अश्शा अश्शा

शेपटीने मी वारीन माश्या


घोडा म्हणाला घोडा म्हणाला

ध्यानात धरीन ध्यानात धरीन

मीही माझ्या शेपटीने

असेच करीन असेच करीन


कुत्रा म्हणाला कुत्रा म्हणाला

खुषीत येईन तेव्हा

शेपूट हलवीत राहीन

खुषीत येईन तेव्हा

शेपूट हलवीत राहीन


मांजरी म्हणाली मांजरी म्हणाली

नाही ग बाई

कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही

खूप खूप रागवीन

तेंव्हा शेपूट फुगवीन शेपूट फुगवीन


माकड म्हणाले

कधी वर कधी बुडी

कधी वर कधी बुडी

शेपटीवर मी मारीन उडी

शेपटीवर मी मारीन उडी


मासा म्हणाला मासा म्हणाला

शेपूट म्हणजे दोन हात दोन हात

पोहत राहीन प्रवाहात

पोहत राहीन प्रवाहात


कांगारू म्हणाले कांगारू म्हणाले

माझे काय तुझे काय हा हा हा

शेपूट म्हणजे पाचवा पाय

शेपूट म्हणजे पाचवा पाय


आ आ आ...


मोर म्हणाला मोर म्हणाला

पीस पीस फुलवुन धरीन मी धरीन

पीस पीस फुलवुन धरीन मी धरीन

पावसाळ्यात नाच मी करीन नाच मी करीन


पोपट म्हणाला छान छान छान छान

देवाच्या देणगीचा ठेवा मान

आपुल्या शेपटाचा उपयोग करा

नाही तर काय होईल

दोन पायाच्या माणसागत

आपुले शेपूट झडून जाईल...



डॉ. भालचंद्र कुलकर्णी

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page