top of page

तुम्ही हे वाचलत का?

श्रीकांत लिमये

तुम्ही हे वाचलत का?

तुम्ही हे वाचलत का?

- श्रीकांत लिमये

घातसूत्र


तुम्ही जर वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी यांवरील बातम्या, आंतरजालावरील माहिती किंवा इतरांशी साधलेल्या संवादातून आपल्या अवतीभवती, जगात काय चाललय यावर लक्ष ठेवून असाल तर तुम्हाला अधूनमधून "हे काय चाललय काय?" असा प्रश्न नक्की पडत असेल. लढाया आणि युद्ध, आर्थिक घोटाळे, मोठमोठ्या बँका बुडणं, अचानक होणारे अपघात यांचा आपल्या जीवनावर होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामां विषयी तुम्ही काळजीसुद्धा करत असाल. अशा काही मोठ्या, ज्याने समाजावर, जगावर दुष्परिणाम झाले आणि त्यातले काही दीर्घकाळ टिकणारे होते अशा घटनांसंबंधी तुम्ही कदाचित काही "षडयंत्रांचे सिद्धांत" (Conspiracy theories) सुद्धा वाचले असतील. उदाहरणर्थ शतकापूर्वी अपघाताने जलसमाधी मिळालेली महाकाय टायटानिक, सप्टेंबर ११, २००१ चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला अतिरेक्यांचा आघात इत्यादी. पण या घटना एकएकट्या सुट्यासुट्या नसून त्या निरनिराळ्या काळात घडवलेल्या एका व्यापक षड्यंत्रांचा भाग आहेत हे लक्षात येणं कठीण आहे.

ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखक दीपक करंजीकरांच्या "घातसूत्र" या पुस्तकात अशाच घटनांची मांडणी एका वेगळ्याच दृष्टीकोनातून केली आहे. उदाहरणार्थ वर उल्लेखिकेला टायटॅनिकचा अपघात खरोखरच केवळ अपघात होता की आणखी काही? वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला अतिरेकी हल्ला फक्त अतिरेकी हल्ला होता की त्यामागे काहीतरी भयानक षड्यंत्र होते? अमेरिकेत फेडरल रीझर्व्ह बँक स्थापन झाली ती बॅंकांमधल्या संयोजन आणि निरंत्रण ठेवण्यासाठी. फेडरल रिझर्व्ह सिस्टिमची रचना कशी आहे? संयोजन आणि नियंत्रण एवढाच हेतू होता की त्यामागे आर्थिकसत्ता ताब्यात ठेवून देशावर अधिकार गाजवण्याचा कुटील हेतू होता/आहे? ज्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी या रिझर्व्ह बॅंक सिस्टिमला विरोध केला होता त्या पांचही अध्यक्षांवर प्राणघातक हल्ले झाले आणि त्यातले चार त्या हल्यांमधे मारले गेले (एक वाचला). हा केवळ योगायोग असू शकतो का?

पहिले आणि दुसरे जागतिक महायुद्ध होण्याची कारणे काही वेगळी होती का? नेपोलिअन आणि ब्रिटिश साम्राज्यामधे झालेल्या वॉटरलूच्या युद्धामधे फायदा कुणाचा झाला? दुसऱ्या महायुद्धात घडलेल्या कुप्रसिद्ध होलोकास्टशी प्रख्यात आणि बलाढ्य कंपनी आय.बी.एम.चा काही संबंध होता का? अशा मती गुंग करणाऱ्या प्रश्न आणि तपशीलांनी हे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरलेले आहे.

पुस्तकाची नुसती अनुक्रमणिका जरी वाचली तरी या पुस्तकाच्या विषयाची व्याप्ती लक्षात येते. वर उल्लेखिलेल्या टायटानिकच्या अपघाती जलसमाधीपासून, दोन्ही जागतिक महायुद्धे, रशियन बोल्शेविक क्रांती, दि ग्रेट डिप्रेशन, भूगर्भ तेलाचा (पेट्रोलिअम्) व्यापार आणि नियंत्रण, मध्यपूर्वेतील ताणतणाव, ते अगदी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या पहिल्या निवडीपर्यंतच्या, आणि संदर्भांसाठी त्याही पूर्वीच्या प्रचंड कालखंडाबद्दल लेखक करंजीकरांनी शोध घेऊन हे पुस्तक लिहिल्याच जाणवतं. एखाद्या भव्य पटावरच्या विविध आकृत्यांची गुंतागुंतीची रचना समजून घेऊन ती वाचकांना उलगडून दाखविण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसतो. ८०० पानांचे हे पुस्तक उत्कंठावर्धक आणि माहितीपूर्ण असलं तरी वाचायला थोडी चिकाटी लागते. पुस्तकात विषयाच्या तपशीलाची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून येतं, त्याच बरोबर मांडणीमधे विस्कळीतपणाही जाणवतो. याचं कारण ही प्रकरणे वेगवेगळ्यावेळी लिहिली गेली हे असावं.

हे पुस्तक तुम्हाला अमेझॉनच्या भारतीय अवतारामधे किंवा अन्य भारतीय पुस्तकांच्या दुकानात आजही उपलब्ध आहे. किंवा तुमच्या भारतातील नातेवाईक/मित्रांच्या मदतीने तुम्ही हे पुस्तक मिळवू शकाल. हे पुस्तक वाचकांना विचारप्रवृत्त करणारे नक्कीच आहे. पण जागतिक सारीपाटावरच्या मोठ्या खेळाडूंच्या स्वार्थी खेळाला रोखण्यासाठी सामान्यजन, म्हणजे आपण सगळे, काहीही करू शकत नाही अशी विषण्णतेची भावना निर्माण करणारेही आहे.


कोंबडीला काय कळतय!

तुमच्या लहानपणी तुम्हाला कोणी घरकोंबडं किंवा घरकोंबडी म्हणून, अथवा उघडउघडपणे कोंबडा वा कोंबडी म्हणून हिणवलं होतं का? त्यावेळी तुमची तशी टिंगल झाली असेल तर निदान आतातरी त्याचं मुळीच वाईट वाटून घेऊ नका. पण त्यासाठी तुम्हाला साय मॉण्टगोमेरी ( SY MONTGOMERY) यांनी लिहिलेलं "What The Chicken Knows" हे पुस्तक वाचायला हवं.

कोंबडीसारख्या जगातील सर्वात जास्त ओळखीच्या पक्षाविषयी आपल्याला किती कमी माहिती असते किंबहुना फारशी माहिती असत नाही याची जाणीव हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला होईल. लेखिकेच्या म्हणण्याप्रमाणे बऱ्याच लोकांना, दुर्दैवाने, कोंबडी म्हणजे जेवणाच्या ताटातील एक पदार्थ एवढीच माहिती असते. अर्थात केवळ अशी जाणीव व्हावी म्हणून हे पुस्तक वाचायला हवं असं नाही.

लेखिकेने हे पुस्तक स्वानुभवावरून लिहिलेलं आहे. एका लहानशा गांवात त्यांनी आवडीने कोंबड्या पाळल्या. होय पाळल्या असं म्हणणच बरोबर आहे कारण यामागे व्यवसाय किंवा उत्पन्नाचं साधन असा त्यांचा विचार नव्हता. विविध प्रकारच्या, प्रजातीच्या कोंबड्या सांभाळताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात सांगीतलेले आहेत. कोंबड्यांच्या वेगवेगळ्या जाती/प्रकार यांचे उल्लेख तर पुस्तकात आहेतच; पण त्यापेक्षा त्यांचं दैनंदिन जीवन, वेगवेगळे स्वभाव, आवडीनिवडी आणि सामान्यपणे भांडणं न करता एकत्र, एकोप्यानं राहण्याची वृत्ती याचं निरनिराळ्या प्रसंगातून त्यांना झालेलं ज्ञान त्यांनी वाचकांसमोर मांडलं आहे.

उदाहरणार्थ कोंबड्यांबरोबर केवळ पुनरुत्पादनासाठी नव्हे तर त्यांच्या संरक्षणासाठी एखादा कोंबडा असणं आवश्यक आणि उपयोगी आहे हे त्या अनुभवातून शिकल्या. हा कोंबडा त्याला जर चांगलं खाणं सापडलं, म्हणजे धान्य, अळ्या, किडे, मांसाचे तुकडे अथवा माणसांनी टाकून दिलेले उरलेले पाव, चीज सारखे पदार्थ, सापडले तर तो आपल्या समुहातल्या कोबड्यांना त्याबद्दल लगेच सांगतो. इतकच नव्हे तर एखाद्या आदर्श कुटुंब प्रमुखाप्रमाणे सगळ्या कोंबड्यांचं खाऊन झालं की मग स्वत: ते खाणं खातो. समुहावर संकट आलं तर एखाद्या लढवय्यासारखा स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कसा शत्रूवर तुटून पडतो, असे अनेक अनुभव त्यांनी वर्णन केले आहेत.

मला कळलेली खरी गंमत म्हणजे कोंबड्यांचे विविध आवाज जे आपल्याला नुसते फालतू क्लक्लक, पकपक किंवा कलकलाट वाटतात ते खरंतर कोबड्यांचा एकमेकांशी चाललेला संवाद असतो. होय, कोंबड्या त्यांच्या "भाषेत" एकमेकांशी बोलत असतात. गप्पा मरतात. विशिष्ट ठिकाणी कुठला खाण्याचा पदार्थ आहे हे सांगतात. ही संशोधनातून समजलेली गोष्ट लेखिका आपल्याला सांगते. विशेषत: कोंबड्यांना जर संकटाची चाहूल लागली तर ते कोणत्या प्रकारचं संकट आहे, कुठल्या दिशेला आहे इतकच नाही तर किती वेगाने येते आहे याचा संदेश इतरांना देतात. यासाठी त्या जे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज वापरतात त्याचे आणि त्या कलकलाटाचे ठराविक नमुने संशोधकांना लक्षात आलेले आहेत. उदाहरणार्थ समजा एखादा साप जवळपास आलेला लक्षात आला तर त्या संदेशाचा आवाज वेगळा. तोच जर एखादा कोल्हा दिसून आला तर त्यासाठी होणारा कलकलाट पहिल्यापेक्षा वेगळा. एखादी घार किंवा ससाणा आकाशात घिरट्या घालताना दिसला तर इतरांना सावध करणारा आणखी निराळा संदेश. या कोंबड्यांचा अभ्यास करणाऱ्यांच्या असं लक्षात आलं की संदेशाप्रमाणे, म्हणजे समजा कोल्हा जवळपास आहे हा संदेश असेल तर इतर कोंबड्या लगेच भोवतालच्या विशिष्ट दिशेकडे किंवा झुडुपाकडे बघतायत. तेच जर घार, ससाण्या संबंधी संदेश असेल तर सगळ्या कोंबड्या वर आकाशात बघू लागतात!

अशी विविधप्रकारची अनुभवातून आणि चौकसपणामुळे संशोधनातून मिळालेली माहिती लेखिकेने या पुस्तकात दिलेली आहे. अशा विषयाचं पुस्तक बऱ्याचदा रटाळ होण्याची शक्यता असते. पण लेखिकेने अतिशय अहज सोप्या भाषेत, वाचकांना अजिबात कंटाळा येणार नाही अशा पद्धतीने हे पुस्तक लिहिले आहे. Atria Books (Simon & Schuster, LLC) यांनी प्रकाशित केलेलं हे ७० पानांचं पुस्तक वाचायला अतिशय सोपं, सहज आणि आनंददायी आहे. अलिकडेच एका संध्याकाळी आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. चंद्रशेखर खाडिलकर यांच्याशी गप्पागोष्टी करण्याचा योग आला होता. तेव्हा त्यांनी या पुस्तकाचा उल्लेख गप्पांमधे केला आणि ते वाचण्यास सुचविले. त्यासाठी त्यांना मन:पूर्वक धन्यवाद!

हे पुस्तक अमेझॉनवर किंवा तुमच्या गांवातल्या पुस्तकांच्या दुकानात तुम्हाला नक्की विकत घेता येईल. सध्या चालू असलेल्या हिवाळ्यात घरातच बसून असताना वाचायला उत्तम.

-------------------------------------------------------------------------------------------------

टीप: मला अमेझॉन अथवा कोणत्याही पुस्तकाच्या दुकानाकडून दलाली/कमिशन मिळत नाही.

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page