माझं वाचन...
पंढरपूर सारख्या छोट्याशा गावात १८७४ साली ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ तत्कालीन न्यायमूर्ती लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी यांनी स्थापन केली. ‘ज्ञानादेव तु कैवल्यम’ असा संदेश देणारी ही संस्था आजही चंद्रभागेच्या तटी उभी आहे. ग्रंथालयाची सुरुवात शेजारीच असलेल्या तत्कालीन व्हिक्टोरिया जुबिली हायस्कूलच्या (आजचे लोकमान्य विद्यालय) एका प्रशस्त खोलीत झाली. त्यानंतर पाच मे १९१७ रोजी या संस्थेने जागा खरेदी केली आणि त्याच जागेवर संस्थेची आजची दुमजली देखणी दगडी इमारत उभी आहे. जुन्या पद्धतीने बांधलेली ही दगडी इमारत हे पंढरपूरचे भूषण आहे. २४ ऑक्टोबर १९३२ रोजी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पंढरपूर भेटीवेळी त्यांच्या हस्ते लायब्ररीच्या या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले व नेटिव्ह जनरल लायब्ररीचे नामकरण “पंढरपूर नगरवाचन मंदिर” असे करण्यात आले. आजच्या घडीला त्या संस्थेत ललित, वैचारिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, बालसाहित्य अशी वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदा असून त्याचीसंख्या ३५ हजाराच्या आसपास आहे.
मी अर्थातच ही सगळी पुस्तकं पाहिली किंवा वाचली नाहीयेत. पण आमच्या लहानपणी एक कुलकर्णी काका दर महिन्याला त्यांच्या मध्यम आकाराच्या नॅायलॅानच्या चौकोनी पिशवीत “एवढी कशी काय मावतात?” असा प्रश्न पडावा इतकी पुस्तकं अगदी नेटकेपणाने लावून आमच्या घरी येत असत. अर्थातच ती सगळी मराठी पुस्तकं असत पण करंदीकर, अत्रे, वि. स. खांडेकरांपासून, मंगला गोडबोले, दुर्गा भागवतांपर्यंत अनेक लेखकांच्या पुस्तकांचा खजिना त्या पोतडीतून बाहेर यायचा. आई मग त्यातली काही पुस्तकं घेऊन आधीच्या महिन्यात घेतलेली परत द्यायची. मजा म्हणजे “वहिनी, हे पुस्तक नवीन आलंय बघा, ह्या विषयावर आहे” अशी माहिती पण ते अधूनमधून पुरवायचे. त्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर ‘पंढरपूर नगरवाचन मंदिर’ असा नवा गडद लंबगोलाकार निळा शिक्का असायचा, प्लॅस्टिक कव्हर असायचं आणि अगदी शालेय पुस्तकांसारखाच नवाकोरा पण हवाहवासा वाटणारा वास असायचा. आईची परवानगी मिळाली तर काही पुस्तकं मला देखील वाचायला मिळायची. मी ती अधाशासारखी वाचत असे. अगदी “ह्यापेक्षा अभ्यासाची पुस्तकं वाचली तर ४ मार्क्स जास्त मिळतील” असं आई म्हणेपर्यंत. (गैरसमज नसावा, मी नेहमी पहिल्या पाचात येणारी, ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारी गुणी मुलगी होते).
पण शाळेची नवीन पुस्तकं आल्यावर सुद्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजीच्या पुस्तकात कुठले गोष्टीवजा लेख आहेत, कुण्या प्रसिद्ध लेखकांचे आहेत ते अनुक्रमणिकेत बघून ते आधी वाचून काढायचे. थोडक्यात काय तर ‘फिक्शन’ वाचायची आवड/ सवय तेंव्हापासून लागली.
काही काळ असा होता की वाणसामानाचे पुड्याचे कागद, दिसेल ते पुस्तक, वर्तमानपत्र वेड्यासारखं वाचलं जायचं कारण पंढरपूर सारख्या छोट्याशा गावात वाचनाची तहान भागत नव्हती. माझ्या बाबांचं पण काहीसं असंच होत असावं कारण माझ्या लहानपणीच त्यांनी पुणे, सांगली, कोल्हापूर येथे नातेवाईकांकडे गेलो की दुकानातून, प्रदर्शनांतून पुस्तकं आणायला सुरुवात केली आणि हळूहळू घरीच वाचनालय तयार केलं. आणि मग तर पु लं, व पु काळे, द मा मिरासदार, प्र के अत्रे, जयवंत दळवी ते दुर्गा भागवत, शांता शेळकेंचे कवितासंग्रह ते शिवाजी सावंतांचं अजरामर मृत्युंजय ते रणजित देसाईंचं स्वामी, कमला सोहोनी ते ऋजुता दिवेकर, प्रवास वर्णनं ते आत्मचरित्रं, कथा कादंबऱ्या ते कवितासंग्रह, श्यामची आई ते ययाती इतकं सुंदर साहित्य वाचायला मिळालं.
पु लंची पुस्तकं वाचताना मी एकटी जोरात हसले की कुणीतरी येऊन बघायचं, “बाय माझी बरी ना” म्हणून. पण वाचताना इतकं तल्लीन होऊन जायला व्हायचं की काय करणार ना. पूर्वरंग, अपूर्वाई वाचताना मी पण त्यांच्याबरोबर प्रवास केलाय, व्यक्ती आणि वल्ली मधली सखाराम गटणे, नारायण, अंतू बर्वा ह्या पात्रांची माझ्या मनात एक ठराविक प्रतिमा आहे, ही माणसं समोर आली तर अगदी तश्शीच दिसतील नक्की.
असा मी असामी, ह(फ)सवणूक, ती फुलराणी, बटाट्याची चाळ, गणगोत, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, खोगीरभरती ही सर्व पुस्तकं मी वाचत गेले आणि प्रत्येक पुस्तकागणीक पुलंच माझे सर्वात आवडते लेखक आहेत हे मनात पक्कं होत गेलं.
लग्नाआधी काही ठरावीकच इंग्रजी पुस्तकं वाचायला मिळाली. त्यातलं प्रकर्षानं आठवतं ते Lee Iacocca an autobiography आणि Harry Potter and the sorcerer’s stone. ली आयकोकांचं आत्मचरित्र अतिशय प्रेरणादायी आहे आणि हॅरी पॉटर अत्यंत थरारक. दोन अगदी भिन्न पुस्तकं पण तेवढीच तल्लीनतेने वाचलेली. त्याचबरोबर वाचलं होतं जेफ्री आर्चरचं Kane and Abel आणि जेन ऑस्टेनचं Pride and Prejudice. ह्या पुस्तकांनी भाषा माझ्या नेहमीच्या पुस्तकांपेक्षा वेगळी असली तरी मला खिळवून ठेवलं होतं हे नक्की आठवतंय. देहभान विसरून, जागरण करून मी एका बैठकीत ही वाचून काढली होती.
लग्नानंतर मिशिगनमधील कालामाझू ह्या परत एकदा छोट्या शहरात आलो आणि तिथली लायब्ररी दाखवून माझ्या नवऱ्याने मला अलिबाबाची गुहाच जणू उघडी करून दिली. तिथे जेफ्री आर्चरची उरलेली सर्व आणि जेन ऑस्ट ेनची मिळतील ती 2/3 पुस्तकं आधी वाचून काढली. मग जॅान ग्रिषम, फ्रेडरिक फोरसाइथ, नोरा रॅाबर्टस, डॅनिएल स्टील, पॅालो कोएल्हो, डॅन ब्राउन, रॅाबिन ली, शॅनन स्टेसी ह्या अत्यंत वेगळ्या साच्याच्या, विषयांच्या पण तेवढ्याच सहजपणे गोष्टी रंगवणार्या कलाकारांची ओळख झाली. मिशेल ओबामांचं becoming पण असंच खिळवून ठेवणारं.
अर्थातच वाचनाचे अनेक फायदे आहेत. एकाग्रता, वैचारिक क्षमता, दुसर्ऱ्यांच्या भावना समजल्याने निर्माण होणारी सहानुभूती, शब्दसंग्रहात वाढ आणि योग्य ठिकाणी वापर, विविध विषयांवर चर्चा करण्याचा आत्मविश्वास इत्यादी. पुस्तकांमुळे नुसती अक्षरं नाही माणसं देखील वाचता येतात.
शाळेत माझं भाषा विषयांवर प् रभुत्व होतंच पण छोट्या गावात राहून मराठी माध्यमातून शिकल्यावर अस्खलित इंग्रजी बोलण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो मला वाचनाने दिला.
पुढे मुलं, नोकरी ह्यामध्ये वाचन कमी होत गेलं पण थांबलं नाही. जमेल तेव्हा, जमेल तसं वाचन चालू असतं. मुलींच्या आग्रहाखातर हॅरी पॉटर, पर्सी जॅक्सन हे देखील वाचलं. ओव्हरड्राईव्ह आणि लिबी ह्या Apps वर पुस्तकं छान वाचता येतात. सध्या ऑडिओबुक्स चा प्रयत्न चालू आहे, अजून तितकंसं जमत नाहीये कारण सारखं लक्ष विचलित होऊन मागे जाऊन पुनःश्च हरिओम करत करत वेळ खूप लागतो आहे. पण हे ही जमेल. आणि हो माझा स्वतःचा मोठा पुस्तक संग्रह तयार करून बाबांचा वारसा पुढे चालवायचा आहे. परत एकदा नवं कोरं पुस्तक हातात आल्यावर त्याचा तोच नवाकोरा वास मनात भरून घेऊन जागरण करून एका बैठकीत पुस्तक वाचून काढायचं आहे. म्हणतात ना तुम्ही वाचत असाल तर तुम्ही कधी एकटे नसता कारण reading brings you unknown friends! तर बघू आता २०२५ मध्ये किती नवीन-जुने मित्र भेटतात.
-केतकी अलुरकर
