कोकणातील पारंपारिक पदार्थ म्हणजे शिरवाळे. कोकणात पूर्वी तांदुळच पिकायचा त्यामुळे तांदळचेच जास्त पदार्थ व्हायचे. आता सारखे गुलाबजाम, श्रीखंड हे पदार्थ नसायचे. पाहुणे आले की शिरवाळे बनायचे. कारण कोकणात तांदूळ आणि नारळ मुबलक प्रमाणात.
शिरवाळे बनवायला लागणारे साहित्य:
१. एक वाटी तांदळाचे पीठ
२. एक नारळ
३. एक वाटी किसलेला गुळ
४. चविपुरते मीठ
५. वेलची पावडर
६. तूप
कृती :-
एक वाटी पाणी उकळत ठेवणे. त्यामधे चिमूटभर मीठ व एक चमचा साजूक तूप घालणे. पाण्याला उकळी आली की तांदळाची पिठी घालणे. चांगले एकजीव करून ती उकड दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे व गॅस बंद करावा. ज्या प्रकारे आपण मोदकाची उकड काढतो अगदी तशीच उकड काढणे.
ती उकड मुरत ठेवण्याच्या वेळेत आपण एका नारळाचा चव मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडे कोमट पाणी घालून नारळाचे घट्टसर दूध काढणे. नारळाच्या दुधात किसलेला गुळ वेलची पावडर घालणे. थोडे केशर घालावे. सगळे मिश्रण एकजीव करून घेणे.
आता आपण जी उकड काढली आहे ती चांगली मऊसूत मळू न घ्यायची, मळताना थोडा पाण्याचा हात लावला तरी चालतो. आपण शेव करतो त्या भांड्याला आतून तुपाचा हात फिरवायचा म्हणजे उकड आत चिकटत नाही. मग उकडीचा एक उंडा त्यामध्ये टाकून छान पैकी गोल आकारात शिरवाळे करायचे. ते शिरवाळे इडली पात्रात तेल लावून पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचे. मस्त पैकी आपले शिरवाळे तयार झाले आहेत. आपण बनविलेल्या नारळाच्या दुधाबरोबर खाण्यास तयार.
-संध्या सुर्वे