top of page

संपादकीय

यश पोतदार

संपादकीय

नमस्कार मित्रहो,


कसे आहात सगळे? मला खात्री आहे की या सारख्या बदलत्या हवामानाला आपण सगळेच कंटाळलेलो आहोत, आणि आपण अपेक्षा करतोय की कधी एकदा अखंड सूर्य उजाडेल, हो की नाही?


अगदी हाच प्रश्न मनात घेऊन मी या अमेरिकच्या भूमिवर आलो २०१४ च्या ऑगस्ट महिन्यात. Fall 2014 ची बॅच होती. अमेरिकेत आलो, नवनवीन अनुभव आले, मिळाले, आणि पुढेच जायचं आहे हे मनात ठासून ठेवलं होतं. मधल्या कोरोनाच्या काळात आयुष्याची पार उलथापालथ झाली, पण तरीही धीर सोडला नाही. आणि परत येऊन मी इतक्या गोड परिवारामध्ये येईन याची खरंच कल्पना केली नव्हती. पण मी ती कल्पना आता सत्यात उतरलेली पाहतोय आणि प्रामाणिकपणे कृतकृत्य झाल्याचं समाधान मला मिळतंय.


फक्त आणि फक्त आपल्यामुळेच...


आता मी हे माझे भाग्यच समजतो की हे पद आणि ही जबाबदारी मला नेमकी आपल्या लाडक्या मराठी मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी लाभली आहे. यासाठी परमेश्वराचे आभार जितके मानेन तितके कमीच.


हा आपला सुवर्णमहोत्सव आणि मैत्रीमेळावा अवर्णनीय व्हावा यासाठी आपल्या NEOMM कुटुंबातले बरेच जण प्रयत्नांची परकाष्ठा करत आहेत. या सुवर्णमहोत्सवाची लकाकी आपल्या प्रेम आणि सहभागाशिवाय कमीच भासेल. ती लकाकी वाढवायला आपली शेजारची मित्रमंडळी येत आहेतच, अवघे सुपंथ धराया...परंतु आपण आपल्या या ५० वर्षे पूर्ण होत असलेल्या गोड घोंगडयाला, ज्याने ह्या क्लिवलंडच्या थंडीत जन्माची उब दिलीये, त्याला एक आपल्या कृतज्ञतेची सोनेरी शिलाई नक्कीच देऊ शकतो.


हे सांगण्याचा मतितार्थ असा की, हे आपल्याच घरचे कार्य आहे असे समजावे आणि जसे या मंडळाने आपणांस जवळ आणत आपले दूरचे घरच इथे आणले, तसेच आता ५० वर्षांनी थोडं एकदा इथल्या या आपल्या घराला "हो, तू माझं घर आहेस" ही भावना देऊ आणि आपल्या या लाडक्या घराचा ५० वा वाढदिवस दणक्यात साजरा करू.


यश पोतदार

ज्योती संपादक

NEOMM २०२५

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page