सुवर्णमहोत्सवी वर्षात संक्रमण करता करताच आपल्या मंडळाने या वर्षीचा पहिला मकर संक्रांत सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला.
मोठ्या अभिमानाने आपल्या मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची गोड बातमी सांगून, या खास असलेल्या वर्षासाठीच्या NEOMM BANNER चे अनावरण करण्यात आले. तो पडदा जसा जसा सरकत गेला तशी तशी आपली उत्कंठाही वाढत होती आणि अनावरण होऊन टाळ्यांचा कडकडाट सुरु होत नाही तोवर मागून आलेल्या त्या सोनेरी ५० अश्या अक्षरातल्या फुग्यांनी एक वेगळाच अनुभव दिला आणि तो टाळ्यांचा कडकडाट अजून वाढला.

त्यानंतर अतिशय सुंदर अश्या मुलाखतीतून सौ. संध्या अशोक देशपांडे, सौ. संध्या कृष्णा देशपांडे व श्रीमती सुनंदा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी मंडळाचा आजवरचा प्रवास आणि या प्रवासात त्यांनी अनुभवलेल्या गोड आठवणींना उजाळा दिला.

आता हा अनुभव त्यांच्या वाची अनुभवताना, आनंद आणि कुतूहलता तर होतीच, की अजून गोष्टी ऐकाव्यात, पण गरम होत असलेल्या जेवणाचे वेगवेगळे वास थोडं मन वळवत होते. मग काय, बाहेर थंडी, मनात अभिमान आणि पोटात भुकेची आग. मुलाखतीची सांगता झाली आणि पाहता पाहता जेवणासाठीची रांग लागली. या रांगेत लहानगी मुलंही होती, जी नुकतीच मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने बनवून आली होती. थोडी पोटाची, थोडी संस्कारांची आणि थोडी कलेची भूक घेऊन.



महाराष्ट्रात, या थंडीच्या दरम्यान जे काही पदार्थ केले जातात आणि ते मजेने, परिवार आणि मित्रजनांच्या सोबतीत साजरे केले जातात, त्याच विचारानं सुंदर असा बेत रचला गेला होता. भोगीची भाजी, वांग्याचे भरीत, ३ प्रकारच्या भाकऱ्या (ज्वारी, बाजरी, तांदूळ), पोळ्या, ठेचा, कढी, खिचडी, बटाटेवडे आणि सर्वात महत्वाच्या आपल्या लाडक्या गुळपोळ्या, आणि आपली आई घालायची तितक्या साजूक तुपासोबत.

त्यानंतर कार्यक्रमाची सांगता स्त्रियांच्या वेगवेगळ्या खेळांनी झाली, ज्यात आनंद आणि हास्यकल्लोळ इतका होता की, ती ऊ र्जा पाहून एका गोष्टीची शाश्वती नक्कीच मिळाली की ही सुवर्णसंक्रांत या सुवर्णमहोत्सवाची पहिली पायरी आहे, फक्त आणि फक्त, अजून वर जाण्यासाठी...



जसे गोड बोलत आलो आहोत आपण आणि एक गोड परिवार झालो आहोत, तसेच गोड बोलत राहू एकमेकांशी, ज्यासाठी संक्रांतीचेच निव्वळ निमित्त नसावे. निमित्त काढूयात, निमित्त शोधूयात, आणि हा परिवार एका कुटुंबासारखाच जपूयात.
काय म्हणता?
यश पोतदार
ज्योती संपादक व Communications Lead
NEOMM २०२५