वाचन संस्कृती धोक्यात...
त्या दिवशी मी वाचनालयात गेले होते. बालविभागातली वेगवेगळी पुस्तकं पाहताना एक पुस्तक माझ्या हातात आलं आणि मला आठवलं यश पहिलीत असताना जेव्हा त्याने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला होता, तेव्हा मी त्याला तेच पुस्तक बक्षीस म्हणून दिले होते. तेव्हापासून त्याला वाचनाची आवड निर्माण झाली.
खरे पाहता वाचन हा एक अतिशय सुंदर छंद आहे. लहानपणी चित्ररूप गोष्टीच्या पुस्तकापासून सुरुवात होते आणि जसजसे वय वाढत जाते, तशी आपली आवड बदलत जाते. वास्तविक पाहता वाचनामुळे आपल्या विचारांची प्रगल्भताच वाढत जाते आणि आणखी निरनिराळ्या विषयांचे ज्ञान मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. ज्ञानप्राप्तीसाठी वाचन हे एक महत्वाचे साधन आहे. वाचनामुळे माणसाला सारासार विचार करण्याची क्षमता प्राप्त होते आणि त्यामुळे त्याच्या जिवनात येणाऱ्या संकटांना, दुःखद प्रसंगांना तोंड देण्याचे धैर्य प्राप्त होते. चांगल्या वाचनाच्या सवयी माणसाला क्षुद्र जाणिवांच्या पलीकडे घेऊन जातात. वाचन माणसाला सुसंस्कृत बनवतं. मोठमोठ्या विद्वानांची, थोर पुरुषांची चरित्रे आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला योग्य अशी दिशा देतात. लोकमान्य टिळकांनी, सावरकरांनी हे वाचनाचे महत्व लक्षात घेऊनच जनतेला जागृत करण्यासाठी अगदी बंदिगृहातही ग्रंथ लिहिले.
मानवी जीवनात 'ग्रंथ हेच गुरु' मानले गेले आहेत. कारण आपल्याजवळ जे काही असेल ते ते संपूर्ण देण्याकडे त्यांचा कल असतो. अहोरात्र विद्यादान करू शकणारे ग्रंथांशिवाय दुसरे कोणीही नाहीत. ग्रंथांकडे मानवी गुरुचे 'गुण' आहेत पण त्यांचे दोष मात्र नाहीत. मनात कुठलाही राग, लोभ न धरता धन, मान, सन्मान यांची अपेक्षा न करता, मुक्तहस्ते ज्ञानाची उधळण करतात हे ग्रंथ. म्हणूनच म्हटले आहे 'ग्रंथ हेच गुरु, ग्रंथ हे तर कल्पतरू'.
जसा कल्पवृक्ष आपल्याला जे हवं ते देतो, त्याचप्रमाणे कोणत्याही विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्याची क्षमता ग्रंथांजवळ असते. मग ते शैक्षणिक ज्ञान असो, मनोरंजन असो वा कलासाहित्य यांचा परिचय असो. व ृद्धापकाळात तर जेव्हा तुमच्या पायात त्राण नसतं, तेव्हा प्रवासवर्णनं वाचून तुम्ही मनानी अगदी प्रत्यक्ष गेल्यासारखे विविध ठिकाणी पोहोचून तिथल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता. पण त्यासाठी, तुमचा वृद्धापकाळ सुकर होण्यासाठी वाचनाची गोडी अगदी लहानपणापासून लागायला हवी. वाचनाची सवय जर लावून घेतलेली असेल, तर ग्रंथ हे तुमचे मित्रच बनतात.
पण हल्लीच्या युवापिढीला 'हे' मित्र नको असतात. त्यांना हवे असतात त्यांच्याबरोबर बाईक उडवणारे, नाक्यांवर थांबणारे, हॉटेल मध्ये जाणारे, उडाणटप्पूपणा करणारे मित्र, जे तुम्हाला चांगल्या वागणुकीचा 'उपदेश' करणारी 'भाषणे' देणारे नसतात. तुमच्याबरोबर चित्रपट पाहणारे, त्यातील गाणी गणारे, नाचणारे असतात. या हल्लीच्या पिढीला चित्रपटगृहात जायला वेळ असतो, Computer वर खेळ खेळण्यासाठी वेळ असतो, गाणी ऐकण्यासाठी वेळ असतो, पण पुस्तकं वाचायला मात्र वेळ नसतो. पुस्तकं वाचायची केव्हा, जेव्हा परीक्षा तोंडावर आली असेल तेव्हा.
कार्यार्थी भजते लोकं यावद्कार्या न सिध्यति|
उत्तीर्णेच परे पारे नौकया किं प्रयोजनम||
ह्या सुभाषिताप्रमाणे परीक्षा संपेपर्यंत पुस्तकं वाचायची, मग कोण विचारतो या पुस्तकांना? ह्या वृत्तीबरोबरच आळस हा एक दुर्गुण आहे, जो वाचन संस्कृती धोक्यात आणत आहे. वेळ असला तरी पुस्तकं वाचायचा कंटाळा केला जातो. अगदी एखाद्या विषयावरची माहिती हवी असेल तरी विविधं पुस्तकं न चाळता गुगलवर मिळणारी आयती माहिती उपयोगात आणली जाते. त्यामुळे त्या विषयाच्या अनुषंगानी येणारी इतर माहिती वाचायचे कष्ट पडत नाहीत. वाचनाच्या नितांत सुंदर सवयीपासून दूर नेणारे अजुन एक कारण म्हणजे निरक्षरता. ह्या निरक्षरतेमुळे त्यांना उत्तम साहित्य वाचता येत नाही आणि आयुष्यातील अनमोल ठेव्यापासून ते वंचित राहतातच, शिवाय त्यांना आपली प्रगतीसुद्धा साध्य करता येत नाही.
'गाव तेथे ग्रंथालय' ही तर आजच्या प्रगत युगाची घोषणा आहे. १९व्या शतकात माणसाला मुद्रणकला अवगत झाली आणि विकासाचा नवा मार्ग खुला झाला. आपले विचार, संशोधन, ज्ञान माणूस पुस्तकांच्या रूपातून लाखो माणसांपुढे कायमस्वरूपी ठेवू शकला आणि वर्तमानपत्रांच्या उदयानंतर तर हातात वर्तमानपत्र असल्याशिवाय सकाळच्या चहालाही गोडी येईनाशी झाली.
अहो म्हणूनच आजच्या वाचन संस्कृती धोक्यात आणणाऱ्यांना मला सांगावेसे वाटते की, ग्रंथात वाणीचा विकास आहे, भावनेचा विलास आहे, प्रतिभेचा प्रकाश आहे, वीराची दिप्ती आहे, हास्य विनोदाची सुक्ती आहे, अन् शांतीची प्रचिती आहे. श्यामची आई पुस्तकातील एक हृदयस्पर्शी प्रसंग सांगवासा वाटतो - परसात फुलं वेचायला गेलेला श्याम पायाला लागलेली माती आईला पदराने पुसून टाकायला सांगतो, त्या वेळेला त्याची आई म्हणते, "पायाला माती लागू नये म्हणून एवढा जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो". हे आयुष्य घडवणारे संस्कार केवळ हे पुस्तक वाचून मिळाले. जशी शरीराला रोज चांगल्या अन्नाची गरज असते, तशीच आपल्या मनालाही दररोज उत्तम विचारांची गरज असते. शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आपण शारिरीक व्यायाम करतो, त्याचप्रमाणे व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी उत्तम वाचन हे केलेच पाहिजे, ते आवश्यकच आहे. म्हणून, सर्वांनी स्मरणात ठेवा...
'वाचाल' तर वाचाल!
प्रियदर्शनी गिरीश पोतदार