top of page
ह्या पुरुषांची व्यथा
तुम्हा सांगू कुणा वेळी
गल्लीतले सिंह कसे
घरी बनतात शेळी
रुद्र झाला सांब तरी
फक्त लोक होती चूप
रागातून पार्वतीच्या
जन्मे गणेशाचे रुप
वध रावणाचा करी
राम एकाच बाणात
पण नशीबी मृगाच्या
मागे धावणे रानात
गीता सांगणारा कृष्ण
सुद्धा बनतो सुदामा
येते घेऊन समोर
जेंव्हा हट्ट सत्यभामा
पराभव देवांचाही
तिथे कोणाला सांगावे
साऱ्या व्यथांचे गाऱ्हाणे
आता कोठे हो मांडावे
माता, भगिनी, प्रेयसी,
पत्नी, मुली आणि सून
साऱ्या नात्यांच्या गर्दीत
पुरुष राबतो कसून
स्त्री अजब रसायन
सदा बोलते कोड्यात
देता प्रश्नांची उत्तरे
जाई आयुष्य खोड्यात
मौन अथवा बोलणे
दोन्हीतही पंचाईत
अन अश्रुधारेपुढे
वीर योद्धेही गळीत
कसे वागावे नरांनी
त्यांची व्यथाच निराळी
गल्लीतले सिंह कसे
घरी बनतात शेळी
bottom of page