धुळ्याच्या मेडिकल काॅलेजसाठी मी प्रयोग केला तेव्हा तिथल्या सुंदर गेस्ट हाऊस मधे त्यांनी माझी उतरण्याची सोय केली होती. माझ्या ईतकेच पोटाचे विकार असलेला माझा भाचा सोबतीला बरोबर होता. आम्ही आमच्या पथ्याच्या जेवणाचा मेनू काळजीपूर्वक सांगितला. मेडीकलची पोरं तो व्यवस्थित घेऊन आली.
'आणखी काही ? ' त्यांच्यातल्या एकाने अदबीने विचारले.
'काही नको' मी म्हणालो.
' तर आणखी काही ? '
'सगळ उत्तम आहे हो.' माझा भाचा म्हणाला, 'गरमगरम आहे. दही आणि पापड देखील आहेत. थॅक्यू.'
'नक्की काही नको? ते दुसरे हे आले होते त्यांना जेवणापूर्वी ड्रिक लागत असं त्यांच्या बरोबर आले होते त्यांनी सांगितले म्हणून विचारतो.'
'या ईकडे या जरा. बसा.'
माझ्याबरोबर आलेले भाचेराव म्हणाले. 'अहो, सोन्यासारखं सात्विक अन्न पचायची ईथे आमची मारामार आहे. ड्रिंक कसल डोंबलाचं घेताय ? आम्ही दोन दिवस जेवू शकू येव्हडे हे अन्न आहे. तुम्हीपण आमच्या बरोबर जेवा. या.'
हा माझा भाचा 'मल्टी पर्पज' आहे. तो माझी काळजी घेतो, रंगमंच व्यवस्था बघतो, अनाउन्समेंन्ट करतो, आयोजकांना परिस्थितीनुसार झापतो किंवा चुचकारतो, पडद्याची पूजा करतो आणि कुठल्याही 'एनसायक्लोपिडीया'त मिळणार नाही अशी अजब (आणि बहुदा निरूपयोगी) माहिती मला वेळोवेळी पुरवत असतो. ''शिरीषमामा, पेशवे पहाटे पावणेचार वाजता ऊठायचे.' ही (खरीखोटी) माहीती कोल्हापूरच्या हाॅटेलात पलंगावर पडल्या पडल्या रात्री दोन वाजता देण्यासारखी आहे का? सापाचे एक ग्रॅम विष केव्हड्याला मिळत हे त्याने मला असे सांगीतलं की जणू मी त्या विषाचा हरवलेल्या मुलाचा घ्यावा तसा शोध घेत होतो. भुसावळच्या कडाक्याच्या थंडीत पहाटे स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या दोन घोड्यांना पाहून त्याने मला लगेच माहीती पुरवली, 'घोड्यावर बसल्याने शरीराची जी हालचाल होते त्याने अन्न पचन सुलभ होते'. (म्हणजे घोडदळाला कधीच अन्नपचनाचे विकार होत नसणार)! हल्याळला (जिथे माझ्या प्रयोगाचे तिकीट कानडीत छापले होते) आयोजकांच्या घरी व्याघ्रचर्माचं आसन पाहुन तो हरखला. व्याघ्रचर्माच्या बैठकीला असलेली ऐतिहासीक पार्श्वभूमी, त्यासाठी ऋषीमुनींनी केलेल्या अट्टाहासाची शास्त्रोक्त कारणमिमांसा, व रोगनिवारण क्षमता यावर त्याने माझे बौध्दीक घेतलं. व्याघ्रचर्माचा मालक आ वासुन ऐकत होता. काही न कळता आपण नुसतेच बसत होतो याचा त्याला गंड वाटला.
' तू का नाही मुलुंडला व्याघ्रचर्मावर बसत ?' मी भाच्याला - मिलींद अधिकारीला विचारले, 'नाहीतरी मला अनेकदा माझ्या कातड्याचे जोडे करुन तुझ्या पायात घालावेसे वाटतात. त्याऐवजी त्याचे आसन करून त्यावर बस.'
'नको.' तो ठासुन म्हणाला, ' त्यामुळे तुझे उरलेसुरले रोग ही मला होतील.'
कोल्हापुरच्या अंबाबाईच्या देवळाची पायरी चढत असताना त्याने अकस्मात मला विचारले, खरी श्रीदेवी कोण तुला माहीतेय?
मला काही समजेना. खरी श्रीदेवी ? म्हणजे 'मि. इंडिया वाली श्रीदेवी खरी श्रीदेवी नाही ?
त्याने माझ्याकडे कीव केल्यासारख पाहील व मग तो लहान मुलाशी बोलाव तस माझ्याशी बोलला, ' मी फिल्मी गोष्टी करत नसुन आध्यात्मीक गोष्टी सांगतोय. अंबाबाईच एक नाव श्रीदेवी आहे. श्रीसुक्तात ते म्हटलय. त्यानंतर तो धाडधाड जे म्हणत सुटला ते ऐकायला साक्षात गागाभट्ट असते तरी त्यांनी मान खाली घातली असती. पारमार्थिक भुमिकेतुन ऐहीक सुखाकडे वळायला त्याला क्षणाचाही विलंब लागत नाही. ही लवचिकता भल्याभल्यांना साधलेली नाही. शिर्डीला साईबाबामय झालेल्या मिलींदने आरती संपल्याक्षणी तिथेच मला विचारले होते, 'मटण मिळेल ना रे आता ?'
किर्लोस्करवाडीला प्रयोगाआधी पडद्याची पूजा करताना तो जवळजवळ ध्यानस्थ झाला होता. आम्ही मागे उभे होतो.
'रात्रीचे जेवण आवडल ?' आयोजकांनी मला दबक्या आवाजात विचारले.
'हो.' ध्यानस्थ मुनी म्हणाला, 'दुपारी असंच चांगल दिलं असतत तर बर झाल असत' त्याचे हात जोडलेले व डोळे मिटलेलेच होते.
आयोजक चपापले. देवाशी व माणसाशी (आणि जेवणाशी) एकाच वेळी संबंध प्रस्थापित करणारा महामानव ते प्रथमच पहात होते.
ईचलकरंजीला आपटे वाचनालयातर्फे माझा प्रयोग होता. कोल्हापूरहून एका मोठ्या लाॅज गाडीतून आम्हाला घेऊन चालले होते. गाडीत आणखीही माणसे होती. एकाएकी मिलींदरावांना 'ब्रेनवेव्ह' आली. माझ्या कानाशी लागून तो म्हणाला, 'आयडिया कशी वाटते बघ हं. त्या ××××× ला मी घरी जेवायला बोलवीन. तो सुरवातीला आमंत्रण स्विकारणार नाही. मी मागेच लागीन. त्याला सांगेन की मला त्यांचे लिखाण अतिशय आवडत. मी तुमचा फॅन आहे. अखेर तो तयार होईल. मग मी त्याची आवडनिवड विचारुन घेईन. त्याच्या सोईने दिवस व वेळ ठरवीन. फोन करुन त्याला आठवण करीत राहीन. तो जेवायला आला की तोंडभरुन त्यांच स्वागत करीन. मी धन्य झालो असं सांगीन व तो पहिला घास घेऊ लागला की मी कडाडीन, 'ऊठ हरामजाद्या, ऊठ. तुझ्या बापाने ठेवलय का रे फुकट जेवण ? जेवण म्हटल्या बरोबर धावत आलास का रे लतकोडग्या ?' 'कशी वाटते आयडिया ?'
आयडिया मला भुईसपाट करुन गेली होती. आयडियेचा आधिचा भाग तो माझ्या कानात कुजबुजल्याने गाडीतल्या कुणाला ऐकु गेला नव्हता. 'मी कडाडीन' असं म्हणून तो जे कडाडला होता ते भुमिकेशी एकरुप झाल्याने गाडीतल्या सर्वांच्या कानाचे पडदे फाटतील एव्हढ्या मोठ्याने होते. माझ्या बरोबर आलेला माझा भाचा माझ्या आंगावर असा वस्सकन का ओरडतोय त्यांना कळेना. 'हरामजादा' हे माझे संबोधन वाटून ते अक्षरश: आवाक झाले. ' तो मी नव्हेच' हे त्यांना कसे कळवावे हे मला कळेना. स्वतःच्या आयडियेवर बेहद्द खुश असलेल्या मिलींदला ईकडे मी नाॅक आऊट झालोय याचा पत्ताच नव्हता. त्याचा फाॅर्म पुढेही टिकला. वाचनालयाच्या रजिस्टरमध्दे मी शेरा लिहून स्वाक्षरी करीत असताना त्याला शेजारच्या पानावर एक नाव व स्वाक्षरी दिसली. ' आयला, हा चोर ईथे पण घुसलाय बघ' तो ओरडला.
तो सन्माननीय चोर माझ्यासारखाच सन्मानाने निमंत्रित केलेला प्रमुख पाहुणा होता व वाचनालयाच्या ट्रस्टीजना वंदनीय होता. हा फालतू तपशील मिलींदच्या खिजगणतीत नव्हता. मी घाईघाईने रजिस्टर बंद केले. त्यातली अन्य नावे वाचून त्याची रसवंती ओघवती झाली असती तर मला सीतामाईसारख भूमिगत व्हाव लागल असत.
पण त्यानंतर बोलता बोलता ' ज्ञानेश्वरी' वर अधिकारवाणीने ( म्हणजे अधिकारी - वाणीने) त्याने काही मल्लीनाथी करुन माणसं अशी काही जिंकून घेतली की ईचलकरंजी सोडताना त्याला परत येण्याचा आग्रह झाला. ' कार्यक्रमाच्या गडबडीत नको, एकटे सवड काढून या. तुमच मटणही राहीलय' कोणीतरी माझ्या समोरच त्याला म्हणाल. मला परत येण्याविषयी कोणी बोललं नाही.
ज्ञानेश्वरी व मटण यांचा तौलनीक अभ्यास करणाला एखादा ग्रंथ त्याने पुढेमागे लिहायला हरकत नाही. क्रिकेट आणि चित्रपट या दोन विषयांवर मी लिहीतो व कार्यक्रम करतो तर आपण मोठी बाजी मारलेय असं मला वाटत, पण मिलींदची विषयांची रेंज व प्रभुत्व पहाता मी त्याच्यापुढे 'किस झाड की पत्ती' ठरतो. जाऊ त्या गावात तो देवस्थानांचा व ऊत्तम मटण देणारे हाॅटेल्सचा शोध घेत असतो.
एकदा मी त्याला म्हणालो, "मिलींद, तुझी पावल ऊमटली तिथे लोकांनी देवळ बांधली आणि तुझा चेहरा दिसला तिकडे बोकडांनी माना टाकल्या !"
त्याच्याशिवाय बाहेरगावी प्रयोगाला जाण्याची कल्पना मला रूचत नाही. ईतर मदत करणारी माणस मिळतीलही, पण क-हाडला किंवा चंद्रपूरला मला 'रावण नाडीपरीक्षा' या पुरातन ग्रंथाची अनमोल माहीती कोण देेणार ? बेळगावात तरुण भारत' चे संपादक किरण ठाकूर यांना भेटुन आल्यावर मी मिलींदला सहज म्हणालो, 'देखणा माणूस आहे नाही ?'
'पुरुषांच्या रुपातलं मला काही कळत नाही.' तो थंडपणे म्हणाला.
भले भाचेराव !
- श्रीमती भारती शिरीष कणेकर यांच्या सौजन्याने