लोकमान्य टिळक यांचे वैज्ञानिक कार्य
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ओळख प्रत्येक भारतीयाला इतिहासाच्या पुस्तकातून झालेली असते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रात रत्नागिरी येथे झाला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवीनच" हे त्यांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे. ब्रिटिशांच्या विरोधातील स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेणारे जहाल मतवादी स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते आपल्याला विदीत आहेत. "केसरीचे" संस्थापक व संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे जनक अशा लोकोत्तर कार्यासाठी ही ते प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू केले. अशा या अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या राजकारण धुरंधर व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी ओळख आपण आता करून घेणार आहोत.
लोकमान्य टिळक हे विद्यार्थी दशेत असल्यापासूनच गणित या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. खगोलशास्त्र निरीक्षणात गोडी निर्माण झाल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की आकाशातील ग्रहताऱ्यांची प्रत्यक्ष स्थिती व पंचांगातील त्यांचे वर्णन हे जुळत नाही. परंतु तरीसुद्धा तत्कालीन भारतात अशीच पंचांगे (Almanac) वापरली जात होती. पंचांगातील गणिते ज्या ग्रंथावरून करतात त्याला 'करणग्रंथ' असे म्हणतात. सुमारे ३५०० वर्षांपूर्वी काश्मीरमधील लगध ऋषींनी लिहिलेला 'वेदांग ज्योतिष' हा करणग्रंथ, आर्यभटाचा 'आर्यभटीय', वराहमिहिराचा 'पंच सिद्धांतिका' व अतिशय प्रसिद्ध असा 'सूर्यसिद्धांत' हा करणग्रंथ इत्यादींवरून भारतात पंचांगे तयार केली जात असत.

पृथ्वी, चंद्र, सूर्य व इतर ग्रह यांची गती व परस्परांमधील अंतर यात काळानुसार बदल होत असतात. हे लक्षात घेऊन वर उल्लेख केलेल्या प्राचीन करणग्रंथानुसार केलेल्या गणितात सुधारणा करणे आवश्यक असते. त्या वेळोवेळी केल्या नाहीत तर पंचांगातील वर्णने व प्रत्यक्ष आकाश यांमध्ये फरक पडायला लागतो. लो. टिळकांनी असा आग्रह धरला की या दोन्ही गोष्टी जुळल्याच पाहिजे व पंचांगे ही अचूकच असायला हवीत. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. यासंबंधी जागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी भारतात ठिकठिकाणी ज्योतिष परिषदा घेतल्या. त्याचा परिपाक म्हणून १९२० च्या सुमारास भारतीय पंचांग कर्त्यांनी दृक-गणिताचा (ग्रहताऱ्यांची प्रत्यक्ष आकाशातील स्थिती व मार्ग यांचे गणित) स्वीकार केला. लोकमान्य टिळकांबरोबरच गणेश दैवज्ञ, व्यंकटेश बापूजी केतकर, डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी वगैरे लोकांनी या कामात भरीव योगदान दिले.
पाश्चिमात्य लोकांना कळावे म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांचे खगोलशास्त्राशी संबंधित ग्रंथ इंग्रजीतून लिहिले. मॅक्समुल्लर या जर्मन पंडिताने वेद हे इसवीसन पूर्व बाराशे वर्षांपूर्वी लिहिल्याचे अनुमान काढले होते. टिळकांना हे अमान्य होते. त्यांनी वेदातील खगोलशास्त्रीय संदर्भ तपासून ज्योतिर्गणिताच्या सहाय्याने वेदांचा काळ इ. स. पूर्व ४ ते ५ हजार वर्षे असा ठरविला. यालाच कालनिश्चिती करणे (Dating) असे म्हणतात. कोणत्याही पाश्चिमात्य संस्कृती पेक्षा वैदिक संस्कृती प्राचीन आहे हे लोकमान्य टिळकांनी 'ओरायन' ग्रंथ लिहून सिद्ध केले.
'आर्कटिक होम इन वेदाज' हा लोकमान्यांचा ग्रंथ १९०३ मध्ये इंग्रजीत प्रकाशित झाला. ऋग्वेदातील काही ऋचांचा अर्थ लावताना त्यांच्या असे लक्षात आले की जिथे सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते, अशाच प्रदेशात ऋग्वेद लिहिला गेला आहे. त्यावरून त्यांनी असे मांडले की आर्य पूर्वजांचे मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशातच असले पाहिजे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी भूगर्भशास्त्र व पुरातत्वशास्त्र यांचाही आधार घेतला. लगध ऋषींनी ३५०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'वेदांग ज्योतिष' या ग्रंथाचा अभ्यास करून लोकमान्यांनी कठीण श्लोकांचे अर्थ सुगम करून 'वेदांग ज्योतिष अँड वेदिक क्रोनोलॉजी' हा ग्रंथ इंग्रजीत लिहिला. या सर्व कार्याची दखल ब्रिटिश व उर्वरित पाश्चिमात्य विद्वानांना घ्यावी लागली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रचंड कार्य, संगणकासारख्या आधुनिक सुविधा नसताना केलेली गणिते व तदनुषंगिक पंचांग सुधारणा, खगोलशास्त्रीय व वैदिक संशोधन, 'केसरी'च्या माध्यमातून केलेली पत्रकारिता, 'गीतारहस्य' सारखा भगवद्गीतेचा परामर्श घेणारे ग्रंथ लेखन, शिक्षण संस्थांची निर्मिती हे सर्व उत्तुंग कार्य लोकमान्यांनी ब्रिटिश साम्राज्य असताना, वेळप्रसंगी छळ व तुरुंगवास सोसूनही अत्यंत प्रभावीपणे केले. हे पाहून मनात उद्गार येतात 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती'.
डॉ. प्रमिला लाहोटी
जून २०२४
क्लीवलंड