नुकतीचं आषाढी एकादशी झाली. आषाढ महिना सुरू झाला की नकळतच आपण कालनिर्णय बघायला लागतो. इथे आपण सर्व व्रतवैकल्ये करत नसलो तरी आषाढी एकादशी कधी आहे हे तरी नक्कीच पाहतो. उपवास नाही केला तरी एकादशीला नॉन व्हेज नको खायला असे वाटते.
आषाढ महिना म्हंटला की आठवतो तो पंढरपूरचा विठोबा आणि ठिकठिकाणून दिंडया घेऊन येणारे वारकरी. टाळमॄदुंगांच्या गजरात येणारा हा महिना घरी येणाऱ्या माहेरवाशिणीचे स्वागत करावे तसे आसमंत हिरवागार करून श्रावणाचे स्वागत करतो.
श्रावण- श्रवण भक्तीचा, व्रतवैकल्ये, उपास, सणसमारंभ, पवित्र असा महिना. हे जरी खरे असले तरी आपल्याला आठवते ती बालकवींची कविता -
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे!
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे!!
खरच हा ऊन पावसाचा खेळ खूपच आल्हाददायक असतो. जसे ग्रीष्मात घामाच्या धारांनी त्रस्त झालेले मन व शरीर श्रावणात येणाऱ्या रिमझिम सरींनी प्रफुल्लीत होते, तसे आमचा हा श्रावण सरी अंक वैविध्यपूर्ण अशा साहित्याने नटलेला आहे. श्रावणावरील सुंदर कवितेने आपल्या अंकाची सुरुवात होते. लोकमान्य टिळकांचे खगोलशास्त्रावरचे प्रभुत्व सांगणारा लेख आपल्याला त्यांची अपरिचित बाजू सांगतो, तर पुरुषांची व्यथा मार्मिकपणे सांगणारी कविता आपल्या ओठावरती नकळत हसू देऊन जाते. अमेरिकेला पहिल्यांदाच भेट देणारे पालक त्यांचा अनुभव लेख ातून व कवितेमधून सांगून जातात. तर BMM अधिवेशनाचा लेख तेथील झालेल्या कार्यक्रमाची सैर करवितो. शिरीष कणेकरांचा भाचा त्यांच्या विनोदी शैलीत आपल्या भेटीस येतो. "तस्मादपी सुभाषितम" सार्थ ठरविणारा सुभाषित भाग २ आपल्याला संस्कृत भाषेच्या संपन्नतेची चुणूक दाखवितो.
हा श्रावण सरी अंक आपणांस कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा.