एका सुसंस्कृत मराठी मंडळाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे नाटक, संगीत, सिनेमा व सणासुदीबरोबर व्याख्याने, गप्पा व इतर ज्ञानवर्धक कार्यक्रमांचेही आयोजन होणे. त्या बाबतीत आपल्या मंडळाने ह्या वर्षी अगदी वसंतव्याख्यानमालेप्रमाणे विविध विषयांवर कार्यक्रम आयोजित केले. त्यापैकी हसू आणि आसू आणून ह्रदय तृप्त करणारा कार्यक्रम होता “आठवणी भाईकाकांच्या”. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या चतुरंग व्यक्तित्वाच्या पु ल देशपांडे ह्यांच्या वैयक्तिक जीवनातील विविध प्रसंगाच्या आठवणी हलक्याफुलक्या भाषेत खुलवून सांगितल्या त्या प्रत्यक्ष पुलंचे पुतणे , श्री जयंत देशपांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ दीपा देशपांडे ह्यांनी.
माळ उत्तम असेल तर कौतुक फुलांचे होते, त्या फुलांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या धाग्यांचे नाही. पुलाच्या अद्वितीय यशामागचा धागा म्हणजे त्यांच्या शिस्तप्रिय पण अत्यंत सह्रुदय सहचारिणी सुनीताबाई देशपांडे. सुनीताबाईंचे पुलंच्या जीवनातले महत्व एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून अगदी खुसखुशीत पण भावपूर्ण पद्धतीने उलगडून दाखवले ते दीपाताईंनी. कर्तृत्वाचा संबंध वक्तृत्वाबरोबरच दातृत्वाशीही असतो हे त्यांनी अधोरेखित करून दाखविले.
पुलंच्या चित्रफिती, आत्मवृत्त, लहानपणापासूनचे त्यांचे भावविश्व व विचार ह्या बरोबरच त्यांचा हजरजबाबीपणा, शीघ्र विनोद आणि स्वतःकडे लहानपण घेऊन इतरांचे कौतुक करण्याची वृत्ती अश्या पुलंच्या विविध छटा ह्या कार्यक्रमातून पाहायला मिळाल्या.
कार्यक्रम सुरेख झालाच पण क्लि व्हलंडकरांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला जो भरघोस प्रतिसाद दिला त्याने आपल्या मंडळाचा सुसंस्कृतपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
