आषाढ! आषाढ महिना येताना सोबत घेऊन येतो तो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणी पंढरपूर ची वारी! थोर संतांच्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलेल्या प्रत्येकाला वारीवरील प्रेम आणी जिव्हाळा वारसाहक्काने मिळालेला असतो.
"आषाढी कार्तिकी विसरू नका गती| पंढरीची वाट धरा विठूकडे मती||"
आपल्या प्रत्येकाच्या मनात एकदा का होईना पण वारीला जाण्याची इच्छा असते. देशापासून हजारो मैल दूर असल्यामुळे ती मनातच राहते.
पण यावर्षी आपली ही सुप्त इच्छा अंशतः का होईना, पूर्ण करण्याचा मार्ग विठुरायाच्या कृपेनेच सुचला! प्रतिकात्मक वारीचा!! आणि मग काय, मंडळ समितीने ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं. बरं, वारी हा काही एकच कार्यक्रम नव्हता, तर त्याचबरोबर शिव-विष्णु मंदीरात महाप्रसादही करायचा अस ठरलं! जबाबदारी मोठी होती पण मागे हटतील ते आपले कार्यकर्ते कसले? सगळे कंबर कसून, पदर खोचून कामाला लागले! Food Committee, Cultural Committee..... Meetings मधला उत्साह तर विचारूच नका! प्रत्येक कामाचा आराखडा तयार केला गेला, प्रत्येकाला कामं वाटली गेली.
आणी, वारीचा दिवस उजाडला! एकीकडे महाप्रसादाची तयारी होत होती तर दुसरीकडे अतिशय सुंदर असा वारीचा देखावा उभा रला जात होता, पालखी सजवली जात होती. या सगळ्या लगबगीमध्ये सगळ्यांच्या मनात एक शंका होती, 'जेवण वेळेत बनेल का? जेवण बनवणाऱ्या
स्वयंसेवकांना वारीत सहभागी होता येईल का?' पण म्हणतात ना "विठ्ठल आमुची माय, विठ्ठल अमुचा बाप". शेवटी तोच आला धावून, आणी जवळ जवळ चारशे लोकांचा सुग्रास स्वयंपाक दोन अडीच तासात बनवून झाला!

सगळे नटून थटून आपल्या मंडळाच्या पहिल्या दिंडीसाठी उत्साहाने सज्ज झाले.

जस ा माउलींच्या दिंडीला हमखास येतो तसा आपल्याही दिंडीला पर्जन्यराजा आला, चार शिंतोडे उडवून त्याचा आनंद व्यक्त केला, आणि पूढची दिंडी सुरळीतपणे पार पडेल याची व्यवस्था करून गेला!

वारी सुरू झाली आणि सगळा परिसर संतांच्या आणि विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमला! उत्साहाने सर्वात पूढे होती ती लहान मुलं. इथे जन्मलेली आपली ही पिढी; त्यांचा इवल्याश्या हातात टाळ, चिपळ्या आणि खांदयावर पताका पाहून वाटलं, यांची नाळ जरी या मातीत पुरली असली तरी जोडली मात्र आपल्या परंपरेशी गेली आहे!


आबाल वृद्ध सगळेचं विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन झाले. डोक्यावर तुळस घेतलेले, रिंगण आणि फुगड्या घालणारे वारकरी पाहताना, मी अमेरिकेत आहे याचा क्षणभर विसर पडला!!

पालखी मंदिराच्या आत झाली. त्यानंतर आरती आणि महाप्रसादाने या दृष्ट लागण्याजोग्या कार्यक्रमाची सांगता झाली.




आपल्या मंडळातल्या समितींचा आपापसातला कमालीचा समन्वय, उत्कृष्ठ संयोजन आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे आपली पाहिली वारी अतिशय उत्तमरित्या पार पडली!
दिंडी संपवून घरी परतताना मन समाधानाने काठोकाठ भरलं होतं आणी डोक्यात अखंड हरीनामाचा जयघोष घुमत होता. ही शिदोरी वर्षभर पुरेल. पुन्हा पुढच्या वर्षी वारीत विठुरायाची भेट होईल अशी आशा आहे.
"जाईन गे माये तया पंढरपूरा, भेटेन माहेरा आपुलिया"
तर मग भेटूया माऊली, पुढील वर्षी वारीला!
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!!
पंढरीनाथ महाराज की जय!!

