top of page

अयोध्येचा राम

मीना दीक्षित

अयोध्येचा राम

यावेळी भारतातून अमेरिकेत परतण्यापूर्वी रामाचे भव्य मंदिर बघावे असे सारखे मनात येत होते. लहानपणापासून राम नाम आपल्याशी किती संबंधित आहे ना! लहानपणीसुद्धा गावागावातून रामजन्मोत्सव साजरा व्हायचा. राम मंदिरात रामजन्माची गाणी, कीर्तने, प्रवरचने व्हायची. सगळ्या थोरामोठ्यांचा त्यात सहभाग असायचा. नमस्कार केला की रामासारखी मोठी हो असा आशीर्वाद सुद्धा मिळायचा. रामरक्षा म्हणावी लागायची. रामाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. रामाची शपथ तर खरीच वाटायची. येणाऱ्या जाणाऱ्यांना ‘राम राम’ म्हणायची सुद्धा पद्धत होती. जीवनात राम असा सहजपणे जनमानसात व्यापून राहिलेला होता. त्या आपल्या रामाचे भव्य मंदिर बांधले जाते, याची प्रत्येक भारतीयासाठी आनंदवार्ता होती.


राम जन्मभूमीत राम मंदिर पाडून बाबराने तेथें बाबरी मशीद उभारली होती याचें दुःख प्रत्येक भारतीयला होते. अनेक पिढ्यांनी त्यासाठी आंदोलने मोर्चे, कारसेवा केलेली होती. हे त्याचे फलित आता पदरात पडत होते आणि याचा संपूर्ण फायदा अत्युत्तम भव्य असे राम मंदिर बांधण्या करीता केला गेला. वर्तमानपत्रे दूरदर्शन सातत्याने ह्या विषयीच्या बातम्या पुरवीत होते. त्याचा प्रचंड पगडा मनावर होता. २२ जानेवारी २०२४ ह्या शुभमुहूर्तावर  रामरायाची प्रतिष्ठापना संपन्नतेने झालेली दूरदर्शनवर पाहिली आणि आपण हे मंदिर बघायलाच पाहिजे अशी इच्छा मनात येत राहिली.


मुंबईतील शीव येथील मराठी विश्व संमेलन २०२४ च्या  बीएमएम च्या सहभागामुळे हा योग लवकर आला. हे मराठी विश्व संमेलन २९ तारखेला संपले आणि ३० जानेवारी तारखेला आयोध्येला ज़ाण्याची तारीख नक्की केली. काही लोक मुंबईहून वाराणसीला गेले तर काही मुंबई लखनऊला जाऊन. मग बसने अयोध्येला ठरल्याप्रमाणे ३० जानेवारीला आम्ही लखनऊला पोहोचलो. चार तासांचा विमान प्रवास होता. लखनऊला पोहोचल्यावर जेवण करून लखनौ शहर बघितले. येथील नवाबांचे महाल बघण्यासारखे आहेत. ५०० हत्तींचे  पुतळे असलेली बागही बघितली. नव्याने बांधलेले रस्ते लाईट, थक्क करणारे आधुनिकरण अगदी आपण भारतात आहोत की परदेशात असे वाटायला लावणारा बदल सतत अनुभवायला मिळत होता. रात्री जरा उशीरा हॉटेलवर आलो फ्रेश होऊन जेवण करून झोपलो कारण सकाळी ४:०० वाजता निघायचे होते. साधारण ४-५ तासांनी अयोध्येला पोहचलो.


सकाळचे वातावरण प्रसन्न होते. गाडी जरा लांब पार्क करावी लागली. पण बरं झालं त्यामुळे चालत जाताना अयोध्येतील घरे, आजूबाजूची माणसे बघता आली. पूर्ण अयोध्या राममय झाली होती. रामलल्लाची प्रतिष्ठापना होऊन अवघा आठवडा होत होता रामाच्या  भक्तगणांचे थवेच्या थवे दर्शनासाठी येत होते. प्रत्येकाच्या तोंडी जय श्रीराम, जय रामलल्ला शब्द होते. जय श्रीराम अशी अक्षरे असलेले गंध कपाळावर लावून घेतले. दर्शनासाठी जाताना रामजन्मभूमीचा परिसर बराच मोठा असल्याचे चालताना जाणवत होते. कडेकोट सुरक्षा होती. व्यवस्था खूप छान होती. सुरक्षततेसाठी कुणालाही मोबाईल आत नेता येत नव्हता. बूट चप्पल व आपले सामान ठेवायला लॉकर होते. हळूहळू सिक्युरिटी वाढत होती. रांगा लांबच लांब होत होत्या पण सतत पुढे सरकत होत्या. आम्ही भव्य दारापर्यंत पोहोचलो. “दानपेटीतच टाकावे कोणालाही पैसे देऊ नका” अशा सक्त सूचना दिल्या जात होत्या.


मंदिराच्या  भव्यदिव्य प्रवेशद्वाराजवळ पोचलो आणि लक्षात आले एका शानदार युगाची सुरुवात झाली आहे. हे मंदिर म्हणजे भारतीयांची धार्मिक आस्था तर आहेच त्याबरोबर मंदिर ही एक अद्भुत शिल्पकृती आहे. सागवान लाकडावर सोन्याचा पत्रा चढवलेले ते भव्य द्वार, सगळीकडे वापरलेला गुलाबी सॅँडस्टोन आणि अष्टधातू ग्रानाईट शाळीग्राम शिळा पायऱ्या चढत असतानाच डावी उजवी कडे भव्य मंडप, मध्यभागी लांबच लांब दानपेटी कुठेही गडबड गोंधळ नाही आणि तरीही सरकती रांग आजूबाजूला बघत गर्भगृहापर्यंत येऊन पोचलो हे कळलेच नाही.


विस्फारलेल्या डोळ्यांनी सगळी भव्यता मनात साठवून ठेवत होतो. काळ्या दगडातील अत्यंत मोहक चेहऱ्यावर हास्य असलेली मूर्ती डोळे भरून पाहत होतो. हिरे माणिक आणि आभूषणांमुळे मूर्तीवरून दृष्टीच हालत नव्हती. मंगलतिलक असलेली ती बाळ रामाची रामलल्लाची मूर्ती बघताना तिच्यापुढे नतमस्तक होताना भरलेले मन आणि डोळ्यातून पाझरणारे पाणी! खरच आपल्या भावनांची कोणती अवस्था असावी ही, आपल्यासारखे भाग्यवान आपणच असे वाटले. उत्तम दर्शन झाल्याचा आनंद मनात रेंगाळत होता. पायऱ्या उतरताना एक दोघांनी त्यांच्या मोबाईलवर फोटो काढले. काही अंतरावर गेल्यावर फोटो काढून देत होते. खाली देणगी देण्यास ही रांग होती. देणगी दिल्यावर पावती दिली जात होती. पावती आणि प्रसाद घेऊन प्रसन्न मनाने देवाच्या आणि देवळाकडे वळून पाहिले तर आठवड्यापूर्वीच्या सजावट आणि फुलांच्या माळा देवाच्या सौंदर्यात भर घालत होत्या.


लक्षात राहते प्राणप्रतिष्ठेच्या वेळी भव्य मंदिर सभोवती केलेली सजावट, अजूनही ताज्या असलेल्या फूल माळा आणि मनात ठसलेली ती श्यामवर्णी हसरी मनमोहक बाल राममूर्ती!!

 

-- मीना दीक्षित  



bottom of page