top of page

आठवणीतील संक्रांत

अपूर्वा चिटणीस

आठवणीतील संक्रांत

माझ्या मैत्रिणीचे आई वडील भारतातून आले होते. त्यांना घरी जेवायला बोलावले. नुकतीच संक्रांत होऊन गेली होती. “तुम्हांला गुळपोळी आवडत असेल तर वाढू का?” मी विचारले. “तुम्ही गुळपोळी घरी केलीत” कौतुकमिश्रित आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. “हल्ली भारतात पण कोणी घरी पोळ्या व तिळगुळ करत नाही. तुम्ही इथे केलीत?"


मनात विचार आला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना, तसे इथे जर घरी केले नाही तर खायला कुठून मिळणार! पाहुणे जेऊन गेले. मी आणि माझा नवरा गप्पा मारत होतो. विषय तोच - हल्ली सणावाराला घरी पदार्ध करणे कसे कमी झाले आहे. आपण भारत सोडून इथे आलो तेव्हाचा आणि आताचा भारत ह्यात काहीच साम्य राहिले नाही, सारे कसे बदललेल आहे. हा तर जिव्हाळ्याचा विषय (तसा आपणा सर्वांचाच) गप्पांच्या ओघात आपल्या लहानपणी कसे सण साजरे व्हायचे हा विषय निघाला. खरच किती मज्जा यायची ना! संक्रांतीला गुळपोळी ही ठरलेलीच. आमच्या लहानपणी कोणत्या सणाला कुठला गोड पदार्थ करायचा हे ठरलेले असायचे जसे की गुढीपाडव्याला श्रीखंड(घरी बनवलेले) रंगपंचमीला पाकातल्या पुऱ्या. त्यावेळी रंगपंचमी खेळली जायची.


आम्हाला वर्षांतून २ दिवस संध्याकाळी ८ वाजेपर्यंत बाहेर राहायची परवानगी मिळत असे. त्यात संक्रांत आणि दसरा हे दोन सण. दोन्ही सणांमध्ये संक्रांत हा जास्त आवडीचा कारण त्या दिवशी मोठ्यांकडून तिळगुळ मिळत असे. आम्ही मैत्रिणी-मैत्रिणी मिळून ओळखीचे, नातेवाईक आणि शिक्षक ह्यांच्याकडे तिळगुळ घ्यायला जात असू. घरी आल्यावर डब्यातून तिळगूळ, रेवडी, हलवा ह्यांचे विलगीकरण होत असे. कोणाला किती रेवड्या मिळाल्या म्हणून विचारणा व्हायची. क्वचित एखादी लिमलेट ची गोळीही मिळायची. आमच्या आनंदाला पारावार राहायचा नाही. थोडक्यात आमच्या लहानपणीचा तो "Halloween” च होता


-अपूर्वा चिटणीस

bottom of page