top of page

गावाकडची मकर संक्रांत

डॉ. वैभव गवळी

गावाकडची मकर संक्रांत

महाराष्ट्राच्या उत्तरेस नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यास लागून गुजरात राज्याच्या सीमेलगत सह्याद्री पर्वत रांगांना सुरुवात होते. घनदाट झाडी, अभयारण्ये, लहान मोठी धरणं आणि मोठ्या प्रमाणात असलेली विस्तीर्ण बागायती शेतीने हा भाग समृद्ध आहे. सह्याद्रीच्या याच पर्वत रांगांमध्ये शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे साल्हेर आणि मुल्हेर सहित अनेक गडकिल्ले येथील निसर्ग सौंदर्य खुलवतात. बाराही महिने वाहणारी "मोसम” नदी या परिसरातील जीवनदायिनी आहे. या प्रदेशाची भौगोलिक रचना, मुबलक शेतजमीन आणि मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती असल्याने आजही हा भाग दुर्गम ग्रामीण क्षेत्रात गणला जातो. सीमावर्ती प्रदेश असल्यामुळे मराठी, गुजराती आणि खान्देशी भाषेचे मिश्रण असलेली "अहिराणी" इथली दैनंदिन व्यवहाराची मुख्य बोलीभाषा आहे. या भागात अनेक वर्षे राहिल्याने येथे साजरी होणाऱ्या मकर संक्रांती सणाच्या काही आठवणी शब्दांकित केल्या आहेत.


हिवाळ्याचे आगमन झाल्यानंतर मकर संक्रांतीच्या सुमारास या भागात थंडी जोर धरू लागते. रब्बी हंगामातील कामे करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असते. या हंगामात मुख्यतः भुईमूग आणि तीळ या एकत्रित पिकाची काढणी पूर्ण होऊन आणि ऊस तोडणीस सुरुवात होते. या दरम्यान काही ठिकाणी उसापासून गुळ बनविण्याचे गुऱ्हाळही सुरु होऊन जाते. मकर संक्रांतीच्या अगदी काही दिवस आधी घराघरात तीळ आणि गुळाचे लाडू बनवण्यास सुरुवात होते. आदिवासी बांधव मुरमूरे, भाजलेले शेंगदाणे, गुळ आणि तिळीचे मिश्रण असलेले लाडू या दिवसात आवर्जून बनवतात.


मकर संक्राती या भागात खूप उत्साहात आणि विशिष्ट परंपरेने साजरी करतात. संक्रांतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून सडा रांगोळीने घरासमोरील अंगण सुशोभित केले जाते. त्यानंतर तीळ वाटून त्यात थोडी हळद आणि दुधाचे मिश्रण असलेले उटणे लावून सकाळचे स्नान आटोपून प्रसन्नतेने उत्सवाची सुरुवात होते. संक्रांतीच्या सणात काळया रंगाचे महत्व लक्षात घेऊन अनेकजण काळी वस्त्र परिधान करतात. सणवार म्हटला कि गोड धोड पदार्थांची रेलचेल आलीच! संक्रांतीनिमित्त आजच्या दिवशी घराघरात पुरण पोळीचं मराठमोळं जेवण बनवतात. विशेष म्हणजे, संक्रांती आधी बनविलेले लाडू आणि पुरणपोळीच्या नैवेद्याची या दिवशी अग्नीत आहुती दिली जाते. त्यानंतर घरातील पूर्वजांचे पूजन करून त्यांच्यासाठी नैवेद्य देण्याची प्रथा या भागात आहे. नैवेद्याचा मान असलेल्या व्यक्तीस जेवणास निमंत्रित करून त्यांच्या सोबत परिवारातील सर्व सदस्य एकत्रित आनंदाने भोजन करण्यात येते.


संक्रांती सणाच्या दिवशी पतंग उडवण्यासाठी युवावर्गात विशेष उत्साह दिसून येतो. हा भाग गुजरात सीमेलगत असल्याने पतंग उत्सवात खूप जल्लोष पाहायला मिळतो. दिवसभर गावात उत्साहाचे वातावरण असते आणि शेतकरी वर्गही शेतातील कामे थांबवून उत्सवात सामील होतो. संध्याकाळच्या वेळेस गजबज अजून वाढू लागते. लोक एकमेकांना भेटण्यासाठी आवर्जून घरोघरी जातात. भेटीगाठी, गप्पा टप्पा आणि हलक्या फुलक्या विनोदांनी भरलेल्या वातावारणाने सर्वांचाच उत्साह वाढू लागतो. लोक घरातील ज्येष्ठांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतात. आबालवृद्धांसह सर्वच एकमेकांना आनंदाने तीळ गुळ देतात. “तीळ गूळ घ्या गोड गोड बोला ... आमचा तीळ गुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका" असे म्हणून लोक आपापसातील असलेले काही मतभेद किंवा जुने भांडण विसरून आपली नाती गोड करण्यासाठी हमखास प्रयत्न करताना दिसतात.


मकर संक्रांती नंतर महिला वर्ग हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करतांना दिसून येतो. घरातच आयोजित होणार हा लोकप्रिय समारंभ उत्साहात साजरा केला जातो. भेटवस्तूंची देवाण घेवाण होते. स्निग्धतेचे प्रतीक असणाऱ्या तीळ आणि गुळाची हि मकर संक्रांत एकूणच सगळ्यांच्या नात्यात आपलेपणाची भावना निर्माण करते.


--डॉ. वैभव गवळी



bottom of page