top of page

निरोप

जय मसुरेकर

निरोप

पंख फुटलेली तू गं

अन् समोर आभाळ

माझ्या वेड्या ह्या मनात

तू गं दुपट्यातील बाळ ॥


तुझ्या येण्याची गं खुशी

सारे घर नाचे ताई

हरखलेल्या बाबांची

हट्ट पुरवाया घाई ॥


तुझ्या अल्लड खोड्यात

मज दिसे कृष्णलीला

तुझ्या बोबड्या बोलांत

मी गं शोधी मुरलीला ॥


किती दूर जरी गेली

तुझा चिवचिवाट कानी

तुझ्या विना पिल्ल्या सारं

कसं घरटं विराणी ॥


कसा देऊ गं निरोप

तू ना काळीज गं माझं

धरु ठेवायचं बळ

आता नाहीच गं माझं ॥


घे तू गगनभरारी

पंख बळकट तुझे

अन् अश्वमेधा तुझ्या

सारे जग पडो खुजे॥


-- जय मसुरेकर

bottom of page