top of page

राजामामा

जय मसुरेकर

राजामामा

काही माणसे ही देवाची लाडकी असतात. राजामामाही त्यातलाच. वास्तविक तो काही माझा सख्खा मामा नाही. माझ्या मामीचा भाऊ. नावाप्रमाणेच अगदी राजा आदमी. दिसायला तर राजबिंडा होताच पण मुख्य म्हणजे वागण्याबोलण्यातही राजा होता.


कोकणस्थी गोरापान रंग, काळ्या गॉगलमागे लपलेले तेजस्वी डोळे , फ्रेंचकट दाढी, गळ्यात सोन्याची साखळी आणि शर्टाचे एखादे बटन उघडे असा एखाद्या हिंदी चित्रपटाचा नायक शोभेल असा प्रथमदर्शनीच लोकांच्या मनात घर करणारा उंचापुरा राजामामा. चालण्याची स्टाईल ही सर्व जग जिंकावयास निघालेल्या सिकंदरासारखी.


मी राजामामाला पहिल्यांदा भेटलो तो ऐंशीच्या दशकात म्हणजे मी शाळकरी वयात असताना. आमच्या पार्ल्यासारख्या बाळबोध उपनगरात रहाणार्या मला डैशींग राजामामा हा एखाद्या वेगळ्याच दुनियेतला वाटायचा. त्यामुळे इच्छा असूनही त्याच्याकडे बोलायला बुजायचो पण दुरून त्याचे निरीक्षण चालूच असायचे.


माझ्या सातवी इयत्तेनंतरच्या सुट्टीत मला पुण्याजवळच्या एका तीन-चार आठवड्यांच्या शिबिराला पाठवण्यात आले. सोबत माझा मामेभाऊ आदित्यही होता. राजामामा पुणेकर म्हणून शिबिराआधी थोडे दिवस त्याच्याकडे मुक्कामाचा बेत होता. आईवडील आजीआजोबा कुणीच सोबत नसताना दुसरीकडे रहायची माझी पहिलीच वेळ. त्यामुळे मनाची प्रचंड धाकधूक होत होती. पण माझ्यापेक्षा तीन वर्षानी लहान आदित्यसमोर माझा चेहरा रडवेला होऊ नये म्हणून उसने अवसानही आणत होतो.


राजामामाने माझ्या मनाची घालमेल पटकन ओळखली. मला जवळ घेतलं आणि म्हणाला “चला, आज जीवाचं पुणे करू. आज बाहेरच जेउया आणि मग तुम्हा दोघांना मस्त आइसक्रीम खायला घालतो." आइसक्रीम हा शब्द ऐकताच मी आणि आदित्य दोघेही खुश झालो. मी जरा जास्तच. ते ऐंशीचे दशक. वाटेल तेंव्हा बाहेर जेवायला जायची आजच्यासारखी पद्धत तेंव्हा नव्हती. माझ्यासारख्या मध्यमवर्गातील मुलांना त्याकाळात आइसक्रीमही सहसा नातेवाईकांच्या लग्नातच खायला मिळायचे. ते ही छोट्या पांढर्या प्लेटमधे रेशन करुन घातलेला व्हैनीला फ्लेवरचा चौकोनी तुकडा ह्या स्वरुपात. नातेवाईक फारच शौकीन असले तर तुकडा कसाटा आइसक्रीमचा असायचा. त्यातून माझे आईवडील शिक्षणक्षेत्रात होते त्यामुळे बाहेर सहसा न जेवण्याचे कारण हे आर्थिक कमी आणि तात्विक जास्त होते. महिन्याभरात एकदा बाबूचा वडापाव खायला मिळाला तरी लॉटरी लागल्यासारखा आनंदीत होणारा मी राजामामाच्या बाहेर जेवायच्या आणि आइसक्रीम खायच्या कार्यक्रमावर तुडुंब खुश झालो नसतो तर आश्चर्य.उंची रेस्टोरांमधे नेऊन राजामामाने आमची ॲार्डर आम्हालाच द्यायला सांगितली. अश्या स्वातंत्र्याचीही मला सवय नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याबरोबर तो मनसोक्त खेळला आणी मग आम्हाला बाजारात नेऊन आंब्याच्या पेट्या घेऊन आला. ती दुपार पोट फुगेस्तव आंबे खाण्यात आणि मग डाराडूर झोपण्यात गेली. आम्ही शिबिराला जाईपर्यंत अशीच धमाल चालू होती.


शिबिर झाल्यावर माझा मामा आणि मामी मुंबईहून मला आणि आदित्यला परत घेऊन जाणार होते पण त्या आधी श्रीवर्धन हरिहरेश्वरला गाडीने जायचा बेत ठरला. उत्तम गाणारे मामा मामी, मनसोक्त दाद देणारा राजामामा आणि संध्याकाळी होणारी गप्पांची मैफिल ह्यात चार दिवस कसे गेले कळलेच नाही. त्या संपूर्ण प्रवासात माझ्या मामामामीच्या आपुलकीनेच राजामामानेही माझी काळजी घेतली. आईबाबा सोबत नसल्याची उणीव मला भासूच दिली नाही. केलेल्या मजेपेक्षा माझ्या मनात घर करून राहीली आहे ती राजामामाची आपुलकी. आदित्य त्याचा सख्खा आणि अत्यंत लाडका भाचा पण त्याने आम्हा दोघांमध्ये कधीच फरक केला नाही. दोघांनीही सदैव एकसमान भरभरून प्रेम दिले.


एखाद्या पुस्तकात मोरपीस जपून ठेवावे तशी ती उन्हाळी सुट्टी माझ्या मनाच्या एका कप्प्यात जपून ठेवली आहे. गेली अनेक वर्षे मी अमेरिकेत आहे. राजामामाशी गेल्या कित्येक वर्षात काहीच संपर्क नाही. पण परवाच राजामामा गेल्याचे कळले आणि नकळत पापण्यांना न जुमानता अश्रुंचा बांध फुटला. ते अश्रु फक्त त्या उमद्या व्क्तीमत्वासाठी नव्हते तर त्याच्या जाण्याने आता दुःखाची झालर मिळालेल्या माझ्या बालपणीच्या आयुष्याच्या सुखद आठवणींनाही दिलेली ती श्रध्दांजली होती. आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात पण आपल्या उमद्या स्वभावाने मनात घर करून रहाणारे विरळाच. जेंव्हा राजामामासारखी माणसं जातात तेंव्हा ती जाताना आपल्या आयुष्यातले त्यांनी समृध्द केलेले ते क्षणही घेऊन जातात. आज मी हवे तेंव्हा हवी तितकी आइसक्रीम विकत घेऊ शकतो, अमेरिकेतल्या उंची रेस्तोरांमध्ये जेऊ शकतो पण त्यात राजामामाच्या आपुलकीचा स्वाद नसल्याने त्याची किंमत शून्यच, नाही का? आता प्रश्न आहे तो एवढाच की मी कधी कोणाचा राजामामा होऊ शकेन का?


-- जय मसुरेकरbottom of page