सुभाषित म्हणजे चांगलं वचन, चांगलं बोलणं. हे नुसते चांगले उद्गार नाहीत. सुभाषितांमधून मानवी जीवनमूल्यांची अभिव्यक्ती, त्यांचं दर्शन होतं आणि ते सुद्धा अतिशय आकर्षक पद्धतीने. चांगलं-वाईट, उदात्त-अनुदात्त, धर्म-अधर्म, योग्यायोग्यतेचा विवेक, जीवनाचे आदर्श काय असायला हवेत? व्यवहारात जगात वागावं कसं? याचं मार्गदर्शन सुभाषितांतून होतं. नेहेमीच्या व्यवहारातली अगदी चपखल उदाहरणं सुभाषितांमधे दृष्टांतासाठी येतात. त्यामुळे कविला जे सांगायचं आहे ते सहज समजेल आणि पटेल अशा प्रकारे वाचक-श्रोत्यांपर्यंत पोचतं. सुभाषितांमधे आलेल्या उपमा, उपमानं आणि दृष्टांत पाहिले की सुभाषितकारांच्या निसर्ग तसेच सामान्य व्यवहारिक घटनांच निरक्षण किती विलक्षण होतं याची जाणीव होते.
लहानपणी शाळेत पुस्तकात वाचलेली आणि ज्येष्ठ नातेवाईक, परिचितांकडून ऐकलेली सुभाषितं आपल्यापैकी बऱ्याच जणांना थोडीफार तरी आठवत असतील. इयत्ता आठवीत संस्कृत विषयाच्या तासाला "हंसो श्वेतो बक: श्वेत: को भेदो बकहंसयो:?, नीरक्षीरविवेकेतु ह्ंसो हंसो बको बक: ॥" या किंवा "काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेदो पिककाकयो:?, वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ॥" अशा एखाद्या सुभाषितापासून झालेली सुभाषितांची ओळख एखाद्या व्यक्ती बरोबरची मैत्री जशी हळुहळू वाढत जावी तशीच वाढत गेली.
सुभाषितं ही खरोखरच संस्कृतभाषेतली रत्न आहेत. याबद्दल ज्या कुणा कविने हा श्लोक रचला आहे तो अगदी योग्य आहे:
भाषासु मधुरा मुख्या दिव्या गीर्वाणभारती
तस्मात् हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम् ॥
कवि म्हणतो, संस्कृत ही सर्व भाषांमधली एक प्रमुख अशी अलौकिक भाषा आहे. त्यामधलं काव्य मधुर आहे आणि त्या काव्यांतही सुभाषिते अधिक मधुर आहेत.
सुभाषितांचे श्लोक वृत्तबद्ध असल्यामुळे ते पाठ व्हायला मदत होते. काही सुभाषितं त्यांच्या वृतांच्या चालीमुळे म्हणायलाही सोपी आणि आकर्षक होतात. लहानपणी पाठ केलेली सुभाषितं आपल्या नकळत आपल्यावर होणाऱ्या सुसंस्कारंमुळे आपल्या जडणघडणीत मोलाची ठरतात. लहानपणी पाठ करताना कदाचित त्या सुभाषितांच्या अर्थाचं गांभिर्य आणि खोली आपल्याला लक्षात येत नसली तरी आपल्याला ती नंतर आयुष्यभर उपयोगी पडतात, मार्गदर्शक ठरतात.
संस्कृत साहित्यात विखुरलेली सुभाषितं खरोखर समुद्रात शिंपल्यांमधे सापडणाऱ्या पाणीदार मोत्यांसारखी आहेत. हे मोती, ही रत्ने आपला सांस्कृतिक ठेवा आहेत. अशा अनेकानेक सुभाषितांमधली मला आवडलेली अन् कदाचित त्यामुळे लक्षात राहिलेली सुभाषितं पुढे दिली आहेत. योगायोगाने या तीनही सुभाषितांमधे आलेले दृष्टांत झाडा संबंधित निरीक्षणांवर आहेत. नेहेमीच्या शब्दार्थ, अन्वय आणि मग अर्थ या प्रकारे मांडणी न करता, सुभाषितांचा सरळ अर्थ दिला आहे ज्यामुळे, मला वाटतं, तांत्रिक क्लिष्टतेत न सापडता अर्थ समजायला सोपा जाईल.
सुजनो न याति वैरं परहितनिरतो विनाशकालेऽपि
छेदेपि चंदनतरु: सुरभयति मुखं कुठारस्य ॥
(भर्तृहरि नीतिशतकम्)
ज्या प्रमाणे चंदनाच झाड कुऱ्हाडीने तोडलं तरीही ते तोडणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्याला सुगंधित करतं. तसे सुजन - सज्जन, चांगल्या प्रवृत्तीचे लोक स्वत:चा विनाशकाळ जरी जवळ आला असला तरी नेहेमी दुसऱ्याचं हित करण्यात मग्न असतात.
अतिपरिचयात् अवज्ञा सन्तत गमनात् अनादरो भवति
मलये भिल्लपुरंध्री चंदनतरुकाष्ठं इंधनं कुरुते ॥
(शारङ्गधरपद्धति:)
ज्या प्रमाणे मलयपर्वतामधे राहणारी भिल्ल स्त्री, तिथे चंदनाची झाडं पुष्कळ असल्यामुळे आणि ती नेहेमीचीच झाल्याने चंदनाची लाकडं चुलीमधे सरपणासाठी वापरते. तिला त्यांचं विशेष मूल्य राहत नाही. त्या प्रमाणे एखाद्याशी अतिपरिचय झाल्यावर आपला अपमान होतो. वारंवार नेहेमी कुणाकडे जाण्याने आपला अनादर होतो.
नात्यंतं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम्
छिद्यंते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठंति पादपा: ॥
(चाणक्यनीति)
जगामधे अतिसरळपणे राहणं व्यावहारिक दृष्ट्या योग्य नाही. जंगलात जाऊन पहा, सरळ वाढलेली झाडं तोडली जातात तर वेड्यावाकड्या झाडांना कोणी हात लावत नाही.
मूलं भुजङ्गै: शिखरं विहङ्गै:
शाखां प्लवंङ्गै: कुसुमानि भृङ्गै:
आश्चर्यमेतत् खलु चन्दन्स्य
परोपकाराय सतां विभूतय: ॥
(हितोपदेश)
ज्याच्या मुळाशी सर्प राहतात, शेंड्यावर पक्षी विश्रांती घेतात, फांद्यांवर वानर राहतात आणि फुलांवर भुंगे गुंजारव करतात असं चंदनाच झाड हे खरोखर एक आश्चर्यच आहे. पण यात आश्चर्य ते काय, सज्जनांच्या विभूती परोपकारासाठीच जन्मलेल्या असतात.
-श्रीकांत लिमये