top of page

Cleveland Cavaliers मध्ये गर्जना परिवार

अभिजीत कुळकर्णी

Cleveland Cavaliers मध्ये  गर्जना परिवार

सालाबादाप्रमाणे गर्जना परिवार गणपती नंतर काही आठवड्यांनी गेट-टुगेदर साठी जमला असताना, आपल्याला Cavs Vs Clippers च्या सामन्यात ढोल ताशाचा परफॉर्मन्स द्यायची संधी चालून आल्याची बातमी मिळाली. कोण तयार आहे असं विचारल्या बरोबर, सगळे एका सुरात आणि एका पायावर तयार झाले. गणपती नंतर थंड पडलेल्या ग्रूप मध्ये अचानक नवीन ऊर्जा आली.


थंडी मध्ये outdoor practice तर अशक्यच. पण मग Middleburg heights basket ball कोर्ट मध्ये प्रॅक्टिस ची सोय झाली. वाजवायला मिळणारा ट्रॅक छोटा असला तरी मोठ्ठ्या स्टेडियमने त्यावर जणू उत्साहाची झालर चढवली होती.


आता प्रश्न आला एवढ्या कमी वेळात नेमकं काय वाजवू शकतो आपण. पण अशावेळी पुणेरी शिवाय उत्तम पर्याय असूच शकत नाही हे प्रॅक्टिस मध्ये चटकन लक्षात आलं. मग काय, झाली तयारी सुरू. ढोल आणि ताशाचा सराव तर होताच, पण यंदा 1 नवीन आव्हान समोर होतं. यावेळी फक्त आम्हाला आपसात न वाजवता, आणखी 70 नृत्यांगनांना सोबत घेऊन सादरीकरण करायचं होतं. आणि त्यातही त्यांच्या गाण्यांना पूरक असं! आणि आम्ही सगळे सतत जागा बदलणार होतो त्यामुळे ताला बरोबर ताफा सुद्धा सांभाळायचा सराव चालू होता. त्यात भर म्हणून 50 सेकंदात आम्हाला सगळ्यांना आपापल्या जागेवर जाऊन उभ राहणं वगैरे गोष्टी सुद्धा सरावाचा भाग झाल्या.


शेवटी गेम डे आलाच. उत्सुकते पाठोपाठ थोड्या भितीनेही मनामध्ये हळूच शिरकाव केला होता. पण जेंव्हा सगळे नटून थटून एकत्र आले तेंव्हा भीती ची जागा जोषानी घेतली. त्यात साक्षी आणि इला ने आणलेल्या चहा आणि नाष्ट्याने तर एकदम तरारी आली. बास्केट बॉल कोर्टाच्या मागे हलक्या हाताने थोडी प्रॅक्टिस केली आणि मग सगळे फोटो सेशन मध्ये दंग झाले.


कोर्टावर पाऊल ठेवलं, ठरल्या प्रमाणे जागा घेतल्या. कमरेवर बांधलेले मोठाले ढोल, ताशा, झांज, टोला हे सगळं क्लीव्हलंडच्या कित्येक अभारतीय लोकांना नवीनच असल्याचं त्यांच्या नजरेतून आणि कुतुहलातून जाणवत होतं. त्याच बरोबर या सगळ्याची सवय आणि कौतुक असलेल्या आणि फक्त आमच्यासाठी तिकडे आलेल्या आपल्या मंडळाच्या लोकांनी आणि मुलांच्या पालकांनी आम्हाला आणखी हुरूप दिला.


शंख ध्वनीनी सुरुवात झाली. सर्वांनी एकरूप होऊन सुरेख सादरीकरण केलं. पुणेरी ढोल ताशाचा जल्लोष, त्यानंतर सुंदर भरतनाट्यम आणि शेवटी बॉलिवूडची सुपरहिट गाणी. आमच्यातल्या कित्येकांना कधी सुरुवात झाली आणि कधी शेवट हे सुद्धा लक्ष्यात आलं नाही. टाळ्यांच्या कडकडाटाने सगळे भानावर आले. अवघ्या साडेतीन मिनिटाचा असला, तरी आयुष्यभर लक्षात राहणारा हा अनुभव होता. त्या दिवशी Cavs ne Clippers ला धूळ चारली आणि आनंद द्विगुणित झाला.


एक मात्र खरं, त्या दिवशी ढोल ताशा बरोबरच आपल्या मराठी मंडळाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा डंका वाजवत आम्ही रॉकेट मोर्टगेज फील्ड हाऊस दणाणून सोडले.


एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते. आपल्या पथकात लहान मुलं - अवनिश, माहिरा आणि जित्सी या सादरीकरणात थेट पुढे उभे राहून आमचं नेतृत्व करत होते. आणि त्यांना बघून आपली 'नेक्स्ट जेन' ही ध्वजा पुढे नेईल यात काहीही शंका नाही.


-- अभिजीत कुळकर्णी



सादरकर्ते:

अवनिश विन्हेरकर

विवेक विन्हेरकर

हेमंत जाधव

जीत्सी कुळकर्णी

माहिरा शर्मा

अपूर्वा कुळकर्णी

अभिजीत कुळकर्णी

विश्वा समंत्रय

राकेश राऊत

इला तामसकर

शुभम बोजेवार

मनीष राय

किरण सोमवंशी

चेतन कुंजीर

अमोल कुळकर्णी

अमित नार्वेकर

साक्षी विन्हेरकर





bottom of page