नमस्कार!
एरव्ही २१ जून च्या जागतिक योग दिनानंतर कुठे बाहेर जाणारे आम्ही यावेळी महाराष्ट्र मंडळ,क्लिव्हलॅन्ड यांच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी लवकर अमेरीकेला आलो. नॉर्थ इस्ट ओहायो मराठी मंडळा बदल मुलीकडून खूप ऐकले असल्याने उत्सुकता होती.

१३ जूनला संध्याकाळी साडेसातला कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रत्येक दिवशी ड्रेसकोड होते प्रत्येकाला सिटनंबर प्रमाणे बॅचेस दिले होते . आज नांदीला दीपप्रज्वलन, जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या मराठी मंडळाच्या प्रवासातील आठवणी, गणेश वंदना नृत्य, नंतर डॉ.सलील कुलकर्णी, त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी, संकर्षण कऱ्हाडे, न िहिरा माडे -जोशी, प्रशांत दामले यांचा कविता, गाणी, गप्पांचा संस्कार ह्या विषयातून फुलत गेलेला ' इन्द्रधनु ' कार्यक्रम खूपच छान रंगला . यात मिहिराने गाईलेलं 'रुणु झुणु रे भ्रमरा' अप्रतिम होतं. बाकीच्यांची गाणी,कविता पण खूपच सुंदर होत्या. रात्री ११ वाजता कार्यक्रम संपला. घरी बारा वाजता पोहोचलो .

दुसरे दिवशी सकाळी सव्वासात -साडेसात ला निघालो. हॉलवर साडेनऊ पर्यंत ब्रेकफास्ट होता.
१० वाजता ' नवरसा ' वर आधारीत 'नवरसात नहाते मराठी ' ह्या कार्यक्रमात प्रामुख्याने लहान मुला मुलींचे (ज्यात आभा म्हणजे आमची नात ) हिचे अद्भूत रस अंतर्गत ' किलबिल किलबिल पक्षी बोलती ' हे नृत्य खू पच अप्रतिम होते. सर्व मुले रंगमंचावर सहजतेने नाचत होती. शांतरस, रौद्ररस, वीररस, करुण रस असे नवरसाच्या संगीत, नृत्य, नाट्यात सर्व रंगून गेले होते. वीररसात ढोलताशा, शिवाजी राजांची अफझल वधाची कथा अगदी पाच -सात मिनिटात सुंदर प्रसृत केली होती. लावणी अगदी ठसक्यात झाली.
त्यानंतर आजूबाजूच्या इतर मंडळातील, म्हणजे कोलंबस मराठी मंडळ ( उत्सव माय मराठीचा, सोहळा मराठी मनाचा ), बफेलो मित्रमंडळ ( वंश परंपरा ), त्रिवेणी मित्रमंडळ ( निरोप ) व कला क्राफ्ट्सचे नाटक यामधे गाणी, नृत्य,नाट्याद्वारे मस्त मनारंजन झाले.

जेवणानंतर दुपारी 3 वाजता दोन वेगळ्या हॉलमधे वेगवेगळे कार्यक्रम होते. आम्ही डॉ. सलील कुलकर्णी यांचे कविता, पटकथा लेखन, शॉर्ट फिल्म संबंधी श िबीर होते तिथे गेलो. खूप छान रीतीने त्यानी सर्व गोष्टी समजावून सांगितल्या.

चहानंतर ४ वाजता खाली मैदानात क्लीव्हलॅन्ड व सिनसिनाटी मंडळाची ढोलताशा जुगलबंदी अप्रतिम होती. दीडदोन तास सतत चाललेल्या कार्यक्रमात सालंकृत स्त्रिया,पुरुष व मुलांचाही सहभाग होता.
परदेशात राहून भारतातून ढोल ताशे व इतर सामग्री मागवून कार्यक्रम करणाऱ्यांचे खरच कौतुक. इकडचे कार्यकमात भाग घेणारे आबाल वृद्ध सर्वच खूप उत्साही व कृतीशील आहेत.

६ वाजता जेवण झाले. त्यानंतर ८ वाजता नॉर्थ इस्ट ओहायो ( NEOMM ) मराठी मंडळाच्या ५० वर्षाच्या वाटचाली बद्दल श ॉर्ट फिल्म ' एक सुवर्ण प्रवास ' ही दाखवली,ती खूपच सुंदर होती. ती करणारा लेखक, दिग्दर्शक, फोटोग्राफर, तसेच सहभागी कलाकार सर्वजण नवीनच असूनही संवाद, नाट्य, चित्रिकरण अगदी अप्रतिम झाले होते.


या कार्यक्रमा नंतर 'शान' च्या कार्यक्रमाचं आबाल वृद्धांना आकर्षण होतं. त्याचं तीन तास जोषात गाणं आणि दमदार क्लासिक नृत्य, आणि तेही वयाच्या पन्नाशी नंतर, खरंच कौतुकास्पद. प्रेक्षकांशी संवाद साधत कार्यक्रमाला रंगत आणणं हे शानचं अफलातून कौशल्य. शानची काही गाणी सर्वांनाच खूप आवडतात...पण वाद्यांच्या आवाजात शानचा आवाज फार कमी ऐकू येत होता. रात्री सव्वा अकरा पर्यंत कार्यक्रम चालला होता.

रविवारी सक ाळी परत साडेसातला समारोपाच्या कार्यक्रमाला निघालो. ब्रेकफास्ट झाल्यावर सत्कार समारंभ व आभार प्रदर्शन झाले . नंतर श्री. संकर्षण कऱ्हाडे नी श्री. प्रशांत दामले यांची मुलाखत आपल्या खुमासदार शैलीत छान रंगवली. मराठी मंडळाने श्री प्रशांत दामलेंना 'हृदय सम्राट' पदवी बहाल करून त्यांच्या आजवरच्या कामाचा गौरव केला.


त्यानंतर पंडीत शौनक अभिषेकी व श्री. महेश काळे यांनी सतत दोन तास नाट्यसंगीत व भक्ती रसात रंगवून, पं. जितेन्द्र अभिषेकींच्या आठवणी जागवत 'परिस स्पर्श' या कार्यकमाअंतर्गत, सर्व प्रेक्षकांना नादब्रह्मात सहभागी करत,भक्तीरसात नखशिखान्त न्हावून कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम तीन दिवसातील सर्व कार्यक्रमांच्या मनोरंजनाचा उच्चा ंक होता.
शेवटी बॉक्स लंचचे वाटप करून समारंभाची सांगता झाली. एवढा मोठा कार्यक्रम, मंडळ तसं छोटं असलं तरी प्रेक्षणीय झाला. सर्व कार्यक्रम वेळेवर सुरु होऊन वेळेवर संपले. जेवणाच्या पदार्थात सुधारण्यास वाव आहे.

तीन दिवस खूप अविस्मरणीय झाले.
यासाठी 'ओहायो महाराष्ट्र मंडळ' सतत आठवत राहिल. मायदेशापासून दूर मायेच्या माणसांची आठवण काढत, इथे मायेचे बंध गुंफत, संस्कारांची जपणूक करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
त्यांचा अमृत महोत्सव, हिरक महोत्सव असाच दणक्यात साजरा होवो ही शुभेच्छा.
सौ शितल कोळवणकर

