top of page

थोडे वेडे व्हा!

प्रियदर्शनी पोतदार

थोडे वेडे व्हा!

त्या दिवशी दुपारी मी निवांत पुस्तक वाचत बसले होते तेव्हा अचानक मुलांचा गलका ऐकू आला " वेडा आला, वेडा आला", म्हणून मी पाहिले तर एक माणूस अंगावर खादी कपडे, डोक्यावर पांढरी टोपी अर्थातच मळलेली अशा अवतारात धावत होता आणि गल्लीतली पोरं त्याच्या मागे त्याची टिंगल करत धावत होती. मला आईकडून समजलं होतं की त्या माणसाचे आजी आजोबा स्वातंत्र्यसेनानी होते तर आईवडील समाजसेवक आणि आता आपणही नेता होऊन समाजसेवा करावी हे त्याचं स्वप्न होतं. पण त्याचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याचं आजचं हे रूप. आपण आपल्या देशवासीयांसाठी सतत काही तरी करत रहाव या वेडाने तो अगदी झपाटलेला होता आणि हे वेडेपण लोकांच्या चेष्टेचा विषय बनला होता.


खरंच! एखाद्या गोष्टीमागे लागून वेडे होणे वाईट गोष्ट आहे का? मला तर वाटतं हा असा वेडेपणाच माणसाला एखाद्या उद्दिष्टापर्यंत पोचवतो. कारण, समजा जर Graham Bell, Newton, Edison हे जर असे त्यांनी लावलेल्या शोधा मागे वेडे झाले नसते तर Telephone, Gravity, Lift व त्या सारख्या अनेक विद्युत् उपकरणांचा शोध कधी लागलाच नसता आणि माणसाची प्रगती खुंटली असती. त्यांचा शोध लावण्यासाठी त्यांच्या मागे वेडे होणे आवश्यक होते. असे हे वेडे होणे काही बोलण्याइतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आपलं घरदार, इतर मोहमाया ह्या सर्वांवर पाणी सोडावं लागतं आणि एक सांगू, जिथे असे वेड लागल्यावर खाण्यापिण्याची शुद्ध रहात नाही तिथे प्रापंचिक मोह काय भुलवणार? म्हणतात ना "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!"


ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संत गोरा कुंभार. प्रपंचासाठी कुंभाराचा व्यवसाय करीत असताना शरीर कुंभाराचे माती तुडवण्याचे काम करीत होते पण मन मात्र पांडुरंगापाशी होतं. त्यांना पांडुरंगाचा ध्यासच लागला होता आणि त्या वेडात मातीबरोबर त्यांनी स्वतःच्या मुलाला तुडवले तरी त्यांना त्याची शुद्ध नव्हती. त्या पायी त्यांना आपले मूल गमवावे लागले. पण ह्या वेडेपणा मुळेच त्यांना पांडुरंग साक्षात् भेटला.


बऱ्याचदा ह्याचा फायदा वैयक्तिक न राहता सर्वांनाच होतो. आता आपले गाडगेबाबाच बघा ना! कोणी जर त्यांचा वेष पाहिला तर म्हणतील, हा काय वेडपट दुधखुळा माणूस आहे? कारण त्यांचा वेष म्हणजे अंगावर रंगीबेरंगी चिंध्या, डोक्यावर खापराचा तुकडा, एका कानात कवडी तर दुसरीकडे तुटक्या बांगडीची काच. पण त्यांना वेड होतं ते मात्र स्वच्छतेचं. दिवसभर हातात खराटा घेऊन गावाची साफसफाई करायची आणि संध्याकाळी आपल्या कीर्तनाने लोकांच्या डोक्यातील घाण साफ करायची. ह्या वेडापायी ते तब्बल अर्धशतक चंदनापरी झिजले. आता सांगा गाडगेबाबांच्या या वेडेपणाचा फायदा त्यांना अधिक झाला की आपल्याला? साहजिकच आपल्याला झाला. गाडगेबाबांचे हे वेडेपण ते ज्या ज्या गावांमध्ये फिरले, केवळ त्या लोकांनाच उपयोगी पडले, पण ज्या वेडाने आपल्या स्वातंत्र्यवीरांना झपाटले होते, ते त्यावेळच्या संपूर्ण भारताला तर उपयोगी पडलेच, पण येणाऱ्या प्रत्येक पिढीला ही उपयोगी पडले. संत गोरा कुंभार, तुकाराम सारख्यांना भक्तीचे तर गाडगेबाबांना स्वच्छतेचे वेड होते, पण आपल्या स्वातंत्र्यवीरांना लागलेले वेड अपरंपार होते. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही.


त्या काळच्या नवयुवकांचे देशभक्तीचे वेड भारताला उपयोगी पडले पण आजकाल च्या नवयुवकांचे वेड हानिकारक ठरू पहात आहे. कारण त्यांना वेड लागले आहे ते नैतिक किंवा अनैतिक मार्गाने पैसा कमावणे, फक्त चैनीचे जीवन जगणे, विविध Disco Pubs मध्ये जाणे, मादक पदार्थांच्या अंमलाखाली बेधुंद राहणे. ह्याचा कोणाला काही फायदा होणार आहे का? त्यांना तर नाहीच पण बाकीच्यांना तर मुळीच नाही. माणसांनी वेडं व्हायला हवे पण एखाद्या विशिष्ट उद्देशाने की ज्याने सर्वांचे भले होईल.


म्हणूनच तर ज्येष्ठ लेखक श्री. वि. द. घाटे म्हणतात,


व्हा! व्हा थोडे वेडे!


अगदीच, नुसतंच आणि नेहमीच शहाणं राहण्यात काय शहाणपणा आहे? आपल्या टिचभर देहातील त्या एवढ्याच्याशा जीवाला जपायचे तरी किती? त्याला किती अंजरायचे गोंजारायचे? त्यांच्यावर किती पांघरूणं घालाल? नेहमीच मोजके बोलायचे, तोलून जेवायचं, जपून चालायचं,मोजून माफक प्रेम करायचं हा काय शहाणपणा झाला? सोडा त्या मनाला जरा मोकळे. वेळापत्रकात न पाहता भटकू द्या त्याला, रेंगाळू द्या, कोणाला तरी कशाला तरी बिलगू द्या त्याला आणि मग मनापासून हसू द्या, मनमोकळे रडू द्या. होऊ द्या त्याला थोडेसे वेडे! थोsssडे वेडे!!


प्रियदर्शनी पोतदार

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page