top of page

वारी इये मराठीचिये नगरीची

श्री. सतीश कोळवणकर

वारी इये मराठीचिये नगरीची

एका मातृभूमीच कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रीयाचे शब्दांकन.


अनेक भारतीय पालकांप्रमाणेच मी आणि माझी पत्नी शितल नेहमीप्रमाणे काही कालावधीनंतर काही दिवसांसाठी माझ्या मुलीच्या घरी क्षितिजा यतीन यांच्याकडे येत असतो. यावेळी येताना इतर कार्यक्रमांबरोबरच ईशान्य ओहायो मराठी मंडळाच्या (NEOMM) सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात व बृहन महाराष्ट्र मंडळ मैत्री मेळाव्यातही सामील होण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या येथील वास्तव्याचे नियोजन केले. पण या मेळाव्याचे स्वरूप पाहिल्यानंतर व प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर न रहावून मला माझे विचार या शब्दांकनातून व्यक्त करावेसे वाटले.


सुरुवातीलाच मराठी माय भूमीची जाणीव सतत टिकविण्यासाठी मराठी संस्कृतीची जाण व तिचे जतन महत्त्वाचे आहे हा मुद्दा श्रीयुत सुदर्शन साठे यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण पण संक्षिप्त प्रास्ताविकात मांडला. ही कार्यक्रमाची नांदीच होती. ही नांदी केवळ प्रास्ताविकापुरतीच मर्यादित न राहता पुढील संपूर्ण कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आला.


हा कार्यक्रम म्हणजे ठिकठिकाणाहून आलेल्या वारकऱ्यांचा मेळावाच होता. त्यात NEOMM, कोलंबस महाराष्ट्र मंडळ, त्रिवेणी मित्र मंडळ, बफेलो मराठी मित्र परिवार, सिनसिनाटी मित्र मंडळ, महाराष्ट्र मंडळ पिटसबर्ग, महाराष्ट्र मंडळ डेट्रॉईट, ऍन आर्बर मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ शिकागो, या विविध मंडळातून दाखल झालेले वारकरी, तसेच आमच्यासारखे भारतातून आलेले नातेवाईक आणि इतर अनेक उत्साही वारकरी अनेक ठिकाणहून जमा झाले होते.


पहिल्या दिवशी पारंपारिक पद्धतीने दीप प्रज्वलन झाल्यावर गणेश वंदनावर आधारित सुंदर नृत्याने सुरुवात झाली. डॉक्टर सलील कुलकर्णी, त्यांचा मुलगा शुभंकर ,संकर्षण कऱ्हाडे, निहिरा माडे जोशी, प्रशांत दामले या सर्वांनी हसत खेळत कविता, गाणी, गप्पांचा "इंद्रधनु" हा कार्यक्रम रंगवत नेला तेव्हा रात्रीचे अकरा कधी वाजले ते कळले देखील नाही.


ree
ree

दुसऱ्या दिवशी, आलेल्या या सर्व मंडळांतर्फे मराठी अस्मिता, रिती रिवाज, सण,गाणी इत्यादीवर आधारित सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी मस्त मनोरंजन झाले. संध्याकाळी NEOMM व सिन सिनाटी मित्र मंडळाची ढोल ताशाची खुल्या मैदानात अप्रतिम जुगलबंदी झाली. ज्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत ताल धरत अनेकांनी यथेच्छ आनंद लुटला. हे अनुभवताना मी अमेरिकेत आहे की मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निष्णात ढोल ताशांच्या मंडळात उभा आहे असा संभ्रम वाटावा. NEOMM तर्फे मंडळाच्या पन्नास वर्षाच्या वाटचालींवर आधारित स्वप्निल पगारे यांनी केलेली "एक सुवर्ण प्रवास" ही पंधरा मिनिटाची आर्ट फिल्म सर्वांना अंतर्मुख करणारी होती. परदेशातील प्रत्येक स्थायिक भारतीय नागरिकांनीच नव्हे तर भारतातील स्थानिक नागरिकांनी आवर्जून पहावी अशी. ही आर्ट फिल्म करणारे सर्व नवोदित होते तरी ती आर्ट फिल्म करणाऱ्या कुठल्याही प्रख्यात व्यावसायिक दिग्दर्शकाच्या तोडीची.


ree

ree

रात्री तीन तास "शान"च्या जोश पूर्ण आवाजाने, तोडीस तोड कर्णभेदी वाद्यवृंदाने आणि भान हरपून बेधुंद नाचणाऱ्या तरुण व बाल प्रेक्षकांनी सर्व सभागृह दणाणून सोडले. माझ्यासारख्या जुन्या पिढीतील काही प्रेक्षकांनी मराठी अस्मिते चा या कार्यक्रमाची संबंध काय अशी शंका काढत नाकेही मुरडली असतील,परंतु कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तो सर्व समावेशक असावा, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करणारा असावा असा विचार जर आयोजकांनी केला असेल तर त्यात वावगे नाही किंबहुना आगामी संमेलनासाठी ही विविधता उपयुक्त ठरेल असे मला वाटते.


ree

तिसऱ्या दिवशी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मरणार्थ सादर केलेल्या "परिस स्पर्श" या कार्यक्रमात पंडित शौनक अभिषेकी आणि श्री महेश काळे यांनी प्रेक्षकांना सहभागी करत सर्व सभागृहाला भक्तिरसात बुडवून टाकले आणि हा तीन दिवसाचा अद्वितीय कार्यक्रम क्लायमॅक्स करून संपवला. या अद्वितीय कार्यक्रमाचे शिवधनुष्य यशस्वी पणे पेलणाऱ्या श्री. उत्कर्ष, सौ तन्मयी आणि त्यांचे सहकारी आयोजक आणि कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा.


ree

पंढरपूरची यात्रा संपताना ठीक ठिकाण हून आलेले वारकरी जसे एकमेकाला गळा भेट देऊन

निरोप घेतात आणि निश्चय करतात ते पुढील वर्षी पुन्हा यात्रेला भेटण्याचा, तसाच काहीसा प्रकार अनुभवायला मिळाला.

या तीन दिवसाच्या, मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी खूप मेहनत घेऊन ठिकठिकाणाहून येऊन साजरा केलेल्या सोहळ्याने सर्व प्रेक्षक हे या विशाल वारकरी संप्रदायाचे अविभाज्य भागच बनले आणि निरोप घेताना निश्चय एक की पुढच्या वारीला नक्की भेट.


सध्या सोशल मीडियामुळे या मेळाव्याचे पडसाद एव्हाना भारतातच नव्हे तर इतर देशातही पोहोचले असतील आणि माझ्यासारखे इतर अनेक कालनिर्णयच्या कॅलेंडरवर पुढील सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी टिक मार्क ही करू लागले असतील. याची दखल संयोजक घेतील याची खात्री आहे.


पंढरपूरच्या वारीला सात आठशे वर्षाची परंपरा आहे तर अमेरिकेतली ही वारी आता धुमधडाक्यात सुरू झाली आहे ती किमान शतकसंवतसर पूर्ण करायच्या निश्चयानेच.


पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.

सतीश कोळवणकर,

एक वारकरी.

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page