top of page

श्रद्धांजली

श्रद्धांजली

शरद शंकर देशमाने पी.एच.डी. ऑर्गॅनिक केमिस्ट्री

(१९ जुलै १९३५ - १९ जुलै २०२५ भारतीय वेळ)


क्लीव्हलंड मराठी मंडळाच्या संस्थापकांपैकी एक, डॉ. शरद देशमाने यांचे गेल्या

१८ जुलैला (भारतीय वेळेप्रमाणे १९ जुलैला) निधन झाले. बरोबर त्याच दिवशी

त्यांनी आपल्या आयुष्याची ९० वर्षें पूर्ण केलीं होतीं. त्यांच्या पश्चात् त्यांची धाकटी

बहीण मीना चांदवडकर आणि तिचे यजमान अरविंद, मोठा मुलगा प्रफुल्ल आणि

त्याची पत्नी सुजाता, धाकटा मुलगा अतुल आणि त्यांचीं नातवंडे, केतकी (आणि

तिचा नवरा पॅट्रिक), शंतनू, सव्यसाची आणि मालिना.


देशमानेंचा जन्म झाला त्यावेळी भारताच्या ब्रिटिश राजवटीविरुद्ध

स्वातंत्र्यलढ्याचे शेवटचे पर्व सुरू होते. त्यात त्यांच्या कुटुंबांतील काही मंडळींचा

सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला तोंड

द्यावे लागले होते. देशमानेंच्या कोवळ्या मनावर त्या आठवणी कायमच्या कोरल्या

गेल्या होत्या आणि त्यांचा परिणाम त्यांच्या पुढील जीवनावर झाला यात शंकाच

नाही. म्हणूनच लहानपणापासून त्यांच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत तेवत राहिली.

त्यांतूनच पुढे उच्च शिक्षण घेण्याची आकांक्षा आणि त्यासाठी अपार कष्ट करण्याची

मनाची तयारी झाली. पुढे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी पी.एच.डी. संपादन केली

आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून अमेरिकेचा रस्ता धरला.


अमेरिकेत आल्यानंतर लवकरच क्लीव्हलँड ओहायोमधील प्रसिद्ध केस वेस्टर्न

रिझर्व विद्यापीठात (CWRU) १९६८ साली प्राध्यापकाची नोकरी सुरू केली.

नुसती नोकरी करून स्वस्थ न बसता जवळच्या मराठी कुटुंबांना एकत्र आणण्याचा

ध्यास धरला. लवकरच या छोट्याशा मराठी गटाने क्लीव्हलँड मराठी मंडळाची स्थापना केली. सुमारे ८-१० वर्षांनंतर त्यांनी सेंट लुईस, मिसूरी येथील सिग्मा केमिकल्स कंपनीत काम सुरू केले.


वरील दोन्ही ठिकाणी स्वतःच्या संशोधनावर त्यांचा भर होताच परंतु

त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच विद्यार्थ्यांनी पी.एच.डी.चे प्रबंधही

सादर केले. त्यातील काही संशोधनांचा आधुनिक वैद्यकशास्त्रावर निश्चितच कुठे ना

कुठे ठसा उमटला असणारच.


देशमानेंच्या स्वभावातल्या काही ठळक गोष्टी होत्या त्या अशा: शांत स्वभाव,

सतत जाणवणारी तत्परता, प्रचंड आत्मविश्वास, कधीही लोप न पावणारा

आशावाद, नाविन्याचा जोश, आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांशीच

अत्यंत प्रेमळ वागणूक. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या या स्वभावाचे पैलू दिसून येत.

परंतु ते सर्वात प्रकर्षाने जाणवले ते त्यांच्या पत्नीच्या दुर्धर अशा कॅन्सरच्या

आजारपणात तिची काळजी घेताना. आणि तिने या जगाचा निरोप घेतल्यानंतर

त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एक वेगळीच दिशा धरली. पुण्यात एक

स्वत:ची जागा घेऊन वर्षातून ३-४ महिने तिकडे राहायला सुरुवात केली. त्यामुळे

त्यांच्या भारताच्या भेटी वाढल्या. जुन्या ओळखींना उजाळा मिळाला. नवीन

मित्रमंडळी मिळाली. त्यांच्याबरोबर पत्ते खेळणे, क्रिकेट बघणे, आंब्यांच्या मोसमात

आंब्यांवर ताव मारणे, अधूनमधून मित्रांबरोबर जगप्रवास करणे वगैरे गोष्टींत

त्यांनी स्वतःला झोकून दिले.


सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे क्लीव्हलंड मराठी मंडळाच्या स्थापनेत त्यांचा

सहभाग होताच. पण त्यानंतर सेंट लुईसला गेल्यानंतरही तिथल्या मराठी

मंडळातही ते कार्यरत राहिले. पुढे निवृत्तीनंतर कॅलिफोर्नियांत बे एरियापासून

सुमारे ५० मैलावर, मॅंटिका इथे राहायला गेल्यानंतरही तिथल्या मराठी मंडळात

(EBMM मधे) त्यांचा नेहेमी सक्रिय सहभाग असे. निरनिराळ्या स्पर्धांत परीक्षकाची भूमिका बजावण्यापासून विजेत्या उमेदवारांना बक्षिसें प्रदान करण्यापर्यंतचा आनंद त्यांनी मिळवला.


त्यांचा मुलगा प्रफुल्ल म्हणतो, “अण्णांनी आम्हाला या स्पर्धात्मक युगात जगावं

कसं हे शिकवलं. आपल्या भोवती घडणाऱ्या अनेक गोष्टी, उदा. समाजातील रूढी,

अध्यात्मवाद, लोकांनी दिलेले सल्ले वगैरे गोष्टी स्वतःचा तारतम्य भाव आणि

विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघूनच स्वीकारायच्या हे त्यांनी आम्हाला

शिकवलं. स्वतःचं जीवन जगताना आपण दुसऱ्याचा बोजा होता कामा नये हे

शिकवलं. समाजाचं आपण काहीतरी ऋण लागतो आणि त्याची परतफेड करताना

दुसऱ्या कुणालाही त्याचा बोजा होऊ देता कामा नये हे शिकवलं. आपल्यांतील

सर्वोच्च काय असेल तर ती एखादी व्यक्ती नव्हे तर तिने मांडलेले विचार हे

शिकवलं.”


त्यांच्या आत्म्यास सद्गति मिळो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

****

©2023 by North East Ohio Marathi Mandal. Proudly created with Wix.com

bottom of page