हेमंत जाधव (NEOMM Webmaster)
Apr 8, 2023
ईशान्य ओहायो मराठी मंडळातर्फे सुप्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय संगीत गायक श्री महेश काळे यांचा स्वरोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला होता. शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ च्या संध्याकाळी पार पडलेला हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी एक यादगार अनुभव ठरला.
मंडळाच्या स्वयंसेवकानी उत्कुष्ट असे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या २ महीने स्वयंसेवकानी घेतलेली मेहनत पाउलो पाऊली दिसत होती. कार्यक्रमाचे आयोजन इंडिपेंडेंस येथील मिडल स्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते. तसे हे सभागृह हे फारच मोठे आहे तरीही अपेक्षापेक्षा जास्तच लोकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. काही प्रेक्षक तर खास सिनसिनाटी, कोलंबस आणि पिट्सबर्गहुन ड्राइव करुन हजर झाले होते.
प्रवेशद्वाराजवळ 'रेजिस्ट्रेशन टीम’ ने सर्व प्रेक्षकांचे स्वागत केले आणि त्यांना त्यांच्या आसनव्यवस्थेबद्धल माहिती दिली. मंद आवाजात वाजणाऱ्या शास्त्रीय संगीताने एक माहौल बनवला होता. कल्चरल कमिटी ने रंगमंच वर केलेली आरास खूपच सुरेख होती.
कार्यक्रमाचा आधी लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाची सुरवात उपाध्यक्षा शेखर गणोरे यानी सर्व रसिकांचे स्वागत करून आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधून केली . सचिव केयूरी हजारनीस यांनी श्री महेश काळे आणि त्यांचा वाद्यवृंदाची ओळख करुन दिली. टाळयांच्या गजरात महेश काळे यांचे रंगमंचावर आगमन झाले. या प्रसंगी दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली.
शास्त्रीय संगीता पासून सुरु झालेला प्रवास हळूहळू पुढे सरकत गेला. महेश काळे यांनी सभागृहातल्या सगळ्यांनाच आपल्या सोबत गायला लावले. सुर निसर्गास हो या त्यांचा प्रसिद्ध गाण्याने कार्यक्रमाचा मध्यंतर झाला.
मध्यंतरानंतर महेश काळे यानी स्वर श्रोत्यांकडून शब्दांच्या पलीकडले हे गाणे सोप्या पद्धतीने शिकवून आणि गाऊन घेतले. त्यानंतर लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ह्या कवीतेला एका नवीन सुरावली मध्ये सादर केले. 'कानडा राजा पंढरीचा' अभंगाने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली.
मंडळाचे अध्यक्ष श्री विवेक विन्हेरकर यानी सर्वांचे आभार मानून केले.
कार्यक्रमाची सांगता जरी झाली असली तरीही उपस्थितांना महेश काळे यांचा सोबत छायाचित्र घेण्याची इच्छा होती. कार्यक्रमानंतर तातडिने पुढील शहरासाठी प्रवास करायचा असूनही त्यांनी प्रत्येकाला सोबत छायाचित्र काढण्याची संधी दिली.