किडनीच्या आरोग्याचे महत्त्व
किडनीचा आजार म्हटलं की अनेकांच्या मनात लगेच भीती निर्माण होते, “आता डायलिसिस करावं लागेल का?” किंवा “किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल का?” पण किडनीचा आजार झाला म्हणजे नेहमीच डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट करावे लागते असे नाही. खरं म्हणजे, सुरुवातीपासून आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली तर किडनीचे अनेक आजार टाळता किंवा नियंत्रित करता येतात.
किडनीचा आजार “सायलेंट किलर” म्हणून ओळखला जातो, कारण सुरुवातीच्या टप्प्यात त्याची ठळक लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांना हा आजा र खूप पुढच्या टप्प्यावर गेल्यावर कळतो. म्हणूनच जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. जगभरात अंदाजे ८५० मिलियन लोकांना किडनीचा आजार आहे, आणि सुमारे १० टक्के लोकसंख्या या आजाराने प्रभावित असू शकते. यातील मोठी अडचण म्हणजे अनेकांना हा आजार असल्याची माहितीच नसते.

❗किडनीच्या आजाराची मुख्य कारणे ❗
किडनीचा आजार प्रामुख्याने काही प्रमुख कारणांमुळे होतो:
डायबिटीस (मधुमेह)
हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब)
हृदयाचे विकार
लठ्ठ्पणा/ वाढलेले वजन (ओबेसिटी, Obesity)
हे सर्व रॊग केवळ किडनीच नव्हे तर शरीरातील इतर अवयवांना सुद्धा घातक ठरु शकतात. भारतासारख्या देशात, जिथे डायबेटिसचे प्रमाण अधिक आहे, तिथे किडनीच्या आजाराचा धोका वाढलेला आढळत ो . किडनीचा आजार कोणालाही होऊ शकतो; व्हेजिटेरियन/ नॉन-व्हेजिटेरियन असो किंवा स्त्री वा पुरुष असो. त्याचप्रमाणे, कुठल्याही वयात किडनीचा आजार होऊ शकतो. जर हा आजार सुरुवातीच्या स्तराला ओळखला गेला नाही तर तो स्टेज 1 पासून स्टेज 5 पर्यंत प्रगती करू शकतो. स्टेज 5 मध्ये अनेक वेळा डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता पडते.
❗तपासणीचे महत्त्व ❗
किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे सहसा दिसत नसल्यामुळे नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्यांना डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार आहे त्यांनी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. वार्षिक हेल्थ चेकअप करताना फक्त “सगळं ठीक आहे” एवढ्यावर समाधान मानू नका. आपल्या डॉक्टरांना स्पष्टपणे विचारा “माझी किडनी व्यवस्थित आहे का?” दोन साध्या तपासण्या किडनीचे आरोग्य समजून घेण्यासाठी मदत करतात:
ब्लड टेस्ट - सीरम क्रिएटिनिन: यामुळे किडनीचे कार्य कसे चालू आहे हे कळते.
युरिन टेस्ट - युरीन मध्ये प्रोटीन आढळणे हे किडनीच्या आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
❗वजन नियंत्रणात ठेवणे ❗
किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी दोन महत्त्वाचे मेट्रिक्स लक्षात ठेवावेत:
१. बॉडी मास इंडेक्स (BMI) BMI हा उंची आणि वजन यांच्या प्रमाणावर मोजला जातो. सामान्य प्रमाणात (पाष्टीमात्य निकष):
18 ते 25 - नॉर्मल
25 ते 30 - ओव्हर वेट
30 पेक्षा जास्त - ओबेसिटी
🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺
परंतु भारतीय उपखंडातील (South Asians) लोकांमध्ये, ही मर्यादा थोडी कमी असते:
18.5 ते 22.9 - नॉर्मल
23 ते 27 - ओव्हर वेट
28 पेक्षा जास्त - ओबेसिटी
🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺🩺
२. वेस्ट-टू-हाइट रेश्यो (Waist-to-Height Ratio) - पोटाभोवती जास्त चरबी असणे हे भविष्य काळातील आजारांचे मोठे कारण असू शकते. हा ratio डायबेटीस, हृदयविकार आणि किडनीच्या सूचना देणारा आहे..
< 0.49: कमी धोका
0.5 ते 0.6: मध्यम स्तरीय धोका
>0.6: सर्वात जास्त धोकादायक
❗पाणी पिण्याची सवय ❗
किडनीच्या आरोग्यासाठी साधे पाणी हे सर्वोत्तम पेय आहे. परंतु “जास्त पाणी प्यायलं की किडनी जास्त स्वच्छ होते” असे नाही. साधा नियम म्हणजे तहान लागेल तेवढेच पाणी प्या. जर तुम्ही उन्हात काम करत असाल, जास्त व्यायाम करत असाल किंवा धावण्यासारख्या शर्यतीत सहभागी होत असाल तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची जरूर भासेल. ज्यूस, सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा जास्त कॉफी हे पाण्याचे योग्य पर्याय नाहीत. त्याच प्रमाणे बिअर प्यायल्याने किडनी स ्वच्छ होत नाही.
❗मिठाचे प्रमाण ❗
World Health Organization च्या शिफारशीनुसार, दररोज मीठाचे सेवन ५ ग्रॅमपेक्षा कमी (सुमारे एक चमचा) असावे. परंतु सर्वसाधारणपणे भारतीय लोक दररोज १२ ते १५ ग्रॅम मीठ सेवन करतात, जे विशेषतः हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि किडनी स्टोन असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.
जास्त मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहत नाही आणि त्यामुळे किडनीवर स्ट्रैन येऊन तिचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आहारातील मीठ नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतीय पदार्थांमध्ये, मुख्यत्वे लोणची, पापड, चकली, चिवडा, फरसाण ह्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे World Health Organization यांनी सुचवलेल्या दररोजच्या एक चमचा मिठाच्या मर्यादेत राहण्यासाठी, आपण रोजच्या आहारातील विविध पदार्थांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
❗औषधांचा जबाबदारीने वापर ❗
काही पेनकिलर्सचा नियमित किंवा जास्त वापर किडनीसाठी हानिकारक ठरू शकतो. ओव्हर-द-काउंटर मिळणाऱ्या औषधांमध्ये इबुप्रोफेन (ibuprofen), नप्रॉक्सेन (Naproxen) यांसारख्या औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो. गरज असल्यास पॅरासिटामॉल (acetaminophen) जसे टायलिनॉल किंवा क्रोसीन (India) तुलनेने सुरक्षित मानले जाते, पण तेही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.
तसेच हर्बल किंवा आयुर्वेदिक औषध घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेकदा या औषधांवर योग्य गुणवत्ता नियंत्रण नसते आणि कधी कधी त्यांचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
❗मार्च: किडनी हेल्थ अवेअरनेस मंथ ❗
गेल्या दोन दशकांपासून मार्च महिना किडनी हेल्थ अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. हा उपक्रम International Society of Nephrology आणि International Federation of Kidney Foundations यांनी सुरू केला आहे. दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी World Kidney Day साजरा केला जातो. या दिवशी जगभर आरोग्य शिबिरे, किडनी वॉक, व्याख्याने आणि जनजागृती कार्यक्रम आयोज ित केले जातात.
❗समुदायासाठी NEOMM किडनी हेल्थ कॅम्प ❗
या निमित्ताने अलिकडेच, ७ मार्च, २०२६ ला वडतळ धाम मंदिरात NEOMM तर्फ़े किडनी हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात किडनीच्या आरोग्याबद्दल माहिती देण्यात आली. या कॅम्पमध्ये सहभागी लोकांचे BMI आणि Waist-to-Height Ratio मोजून त्यांना त्यांच्या आरोग्याच्या जोखमीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच National Kidney Foundation (किडनी.ऑर्ग) यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीपत्रकांमुळे लोकांना अधिक माहिती मिळाली. या कार्यक्रमात डॉ. विदुला खाडिलकर यांनी लहान मुलांमध्ये हाय ब्लड प्रेशर कसा ओळखायचा आणि नियंत्रणात ठेवायचा याबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले. लहान वयातच योग्य निदान आणि उपचार झाल्यास पुढील आयुष्यातील अनेक गंभीर समस्या टाळू शकता. तसेच सौ. प्रांजली साठे ह्यांनी हेलधी लाइफ़ स्टाईलवर पोस्टर प्रेसेंटेशन केले होते.
❗शेवटचा संदेश ❗
किडनीचा आजार वेळीच ओळखला तर नियंत्रित करता येतो किंवा टाळताही येतो. योग्य जीवनशैली, नियमित तपासणी आणि जागरूकता यामुळे आपण किडनीचे आरोग्य आपण दीर्घकाळ जपू शकतो.
कधी कधी सर्वात महत्त्वाचा प्रश्न फक्त एवढाच असतो - “माझी किडनी निरोगी आहे का?”
❗अधिक माहितीसाठी ❗
किडनीच्या आरोग्याबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास Kidney Education Foundation यांच्या KidneyEducation.com या वेबसाइटवर अवश्य भेट द्या. या वेबसाइट वर किडनीच्या विविध आजारांबद्दल सुमारे २०० पानांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही माहिती सामान्य लोकांसाठी (नॉन-मेडिकल व्यक्तींसाठी) सोप्या भाषेत लिहिलेली आहे, जेणेकरून प्रत्येकाला किडनीचे आरोग्य समजून घेता येईल. हे पुस्तक जवळजवळ ४० भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहे आणि ते पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. आतापर्यंत या KidneyEducation.com या वेबसाईटवर १० कोटींहून अधिक (100 million) visits झाल्या आहेत आणि सुमारे ८ लाख (800,000) लोकांनी ही माहिती डाउनलोड केली आहे. त्यामुळे या ज्ञानाचा जरूर लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबीयांपर्यंत व मित्रांपर्यंतही ही माहिती पोहोचवा.

डॉ. तुषार वच्छराजानी

