एक ४-५ वर्षाचा मुलगा रोज जेवताना आणि झोपताना त्याच्या काकांकडे गोष्ट सांगण्यासाठी हट्ट धरायचा. आणि गोष्ट सुद्धा शिवाजी महाराजांचीच; इतर कुठल्याही गोष्टीने काम भागत नसे. काकासुद्धा लाडक्या पुतण्याचा हट्ट अगदी हौसेने पुरवत. चार भावंडांमधे वडील सगळ्यात धाकटे असल्याने मोठे काका या मुलाला आजोबांप्रमाणेच वाटत; प्रसंगी दरारा पण इतरवेळी तोच मायेचा ओलावा आणि निर्व्याज्य प्रेम.काकांनी सांगितलेल्या गोष्टीं मधले लाखभर फौजेत घुसून शास्ताखानाची बोटे छाटणारे महाराज आणि त्यांचे सरदार म्हणजेच तान्हाजी, येसाजी, बाजी, नेतोजी हे सर्व त्या मु लाला एखाद्या सुपरहिरो प्रमाणे भासत असत.
वर उल्लेख केलेला हा ४-५ वर्षाचा मुलगा दूसरा-तिसरा कोणी नसून मीच आहे. लहानपणी काकांच्या गोष्टीं मधून महाराजांची ओळख झाल्यानंतर येणाऱ्या काळात विविध माध्यमातून महाराज भेटत गेले. चौका-चौकात साजरी होणारी शिवजयंती असेल, वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय मंचावरुन होणारा महाराजांचा उल्लेख असेल, 'जाणता राजा" सारखे महानाट्य असेल किंवा विवध इतिहासकारांची व्याख्याने असतील यांसर्वांतुन महाराज कानावर पडत होते. नगरच्या जिल्हावाचनलयातील विविध पुस्तकांमधून वाचनातही येत होते. यासर्वांमधून खरे महाराज कोणते हे ठरवण्याची बुद्धी महाराजच देत गेले.
पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आल्यानंतर माझ्या बहिणीची मुले व आपल्या NEOMM परिवारातील मुले-मुली यांच्या माध्यमातून अमेरिकेतील मुले व त्यांच्या शालेय जीवनाशी जवळचा संबंध आला. मला ज्या वयात महाराजांबद्दल प्रचंड कुतुहल व अधिकाधीक माहिती जाणून घेण्याची ओढ वाटायची, त्याच वयातील या मुलांना महाराजांबद्दल फारशी माहिती नव्हती. आणि ते स्वाभाविकही होते. मुलांवरील संस्कार जसे घरातून होतात तसे ते समाजातूनही होतात. माझ्यासारख्या महाराष्ट्रात वाढलेल्या मुलांना जे सामाजिक वातावरण मिळाले तसे या मुलांना इथे मिळणे शक्य नव्हते. आणि पालकांकडूनही रोजच्या धावपळीत ही गोष्ट राहून जात होती.

