प्रिय NEOMM परिवार,
या वर्षी आपल्या NEOMM संघटनेने सुवर्णमहोत्सवी ५० वर्षांचा प्रवास थाटात पूर्ण केला—हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. या ऐतिहासिक वर्षात अध्यक्ष म्हणून सेवा करण्याचा मान मिळाला, याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, सहभागामुळे आणि विश्वासामुळे हा प्रवास माझ्यासाठी अधिक अर्थपूर्ण ठरला.
या वर्षातील सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे आपला भव्य BMM मैत्री मेळावा, ज्यात मराठी संस्कृती, कला आणि समुदाय भावाची सुंदर अनुभूती मिळाली. त्याचबरोबर आपण संक्रांत, गुढीपाडवा आणि श्रीरामनवमी हे पारंपरिक सण एकत्र येऊन साजरे केले. विशेषतः गुढी पाडव्याच्या दिवशी आयोजित केलेलं पंगत जेवण हे सर्वांसाठी आठवणीत राहिले.
NEOMM ची जत्रा नेहमीप्रमाणे उत्साह, गजबज आणि आनंदाने भरलेली होती, तर वार्षिक पिकनिकमध्ये आपण निसर्गाच्या सानिध्यात सुंदर क्षण एकत्र घालवले. मुलांसाठी आयोजित केलेला समर कॅम्प सुद्धा या वर्षातील विशेष ठरला.
या वर्षातील सर्वात ऐतिहासिक आणि अभिमानाची नोंद म्हणजे पहिल्यांदाच आयोजित केलेला १० दिवसांचा गणेशोत्सव — “क्लिव्हलंडचा राजा”. आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, दैनंदिन सामूहिक सहभाग आणि भक्तीभाव यांनी हा उत्सव खऱ्या अर्थाने भव्य आणि अविस्मरणीय झाला. Cleveland शहराने प्रथमच असा गणेशोत्सव अनुभवला आणि आपल्या सदस्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यंदाचं वर्ष आणखी विशेष ठरलं कारण आपण प्रशांत दामले यांचं लोकप्रिय नाटक “शिकायला गेलो एक” चा प्रयोग Cleveland मधे आयोजीत केला. दामलेंच्या अप्रतिम विनोदबुद्धीने आणि त्यांच्या टीमच्या उत्तम सादरीकरणाने प्रेक्षक पोट धरुन हसले. हा कार्यक्रम NEOMM च्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील खऱ्या अर्थाने एक सुवर्णक्षण ठरला.

