फेसबुकवरील स्नोई आऊलच्या पोस्ट्सनी माझे लक्ष वेधून घेतले. शिकागोमध्ये या सुंदर हिमघुबडांच्या एका जोडप्याचे दर्शन झाले होते, आणि एका पोस्टमध्ये तर त्यांना पेरिग्रीन फाल्कनने त्रस्त केल्याचेही नमूद केले होते. एकंदर काय तर हे सगळे अनुभवायची उत्तम संधी चालून आली होती.
स्नोई आऊल पाहण्याचे स्वप्न खूप दिवस उराशी बाळगून होते. पण शिकागो काही इतके जवळ नाही की एका दिवसात मिशन पूर्ण करून परत येता येईल. आमच्या घरापासून शिकागोचे अंतर ६–७ तासांचे असल्याने आणि आठवड्याच्या कामाच्या दिवसांत प्रवास करणे जवळजवळ अशक्यच होते.
मी त्या घुबडांच्या दर्शनाबद्दलचे अपडेट्स लक्षपूर्वक पाहू लागले आणि विकेंडची आतुरतेने वाट पाहू लागले. थँक्सगिव्हिंगचा मोठा विकेंड जवळ येत होता आणि अजूनही ते घुबड दिसत होते — माझी आशा पुन्हा उंचावली. ऑफिसचे काम संपवताना मी मनात प्रवासाची आखणी करू लागले आणि त्याबद्दल माझ्या नवऱ्याशी बोलले; त्यानेही लगेच होकार दिला.
क्लीव्लँड भागात हिमवादळाचा इशारा होता, त्यामुळे गुरुवारी प्रवास धोकादायक ठरू शकत होता. म्हणून आम्ही बुधवारी संध्याकाळी कामानंतर निघायचे ठरवले. दोन दिवसांसाठी लागणारे सामान बांधून घेतले आणि आम्ही सुमारे ५ ला प्रवास सुरू केला.
हलकी बर्फवृष्टी प्रवासभर चालूच होती. मी खूपच काळजीपूर्वक गाडी चालवत होते कारण बर्फात गाडी चालवण्याचा माझा तो पहिलाच अनुभव होता.
आम्ही रात्री सुमारे ११ वाजता शिकागोला पोहोचलो आणि तिथेच एक हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून आम्ही ४० मिनिटांचा प्रवास करत लिंकन पार्कमधील मॉन्ट्रोज पॉईंट बर्ड सॅंक्च्युरीमध्ये पोहोचलो. पार्किंग शोधताना मला दुरूनच दुर्बिणी आणि कॅमेऱ्यांसह उभे असलेले बर्डर्स दिसले. गाडी पार्क करून मी पटकन स्नो कोट, हातमोजे, टोपी, दुर्बिण आणि कॅमेरा घेतला आणि त्या ठिकाणी धाव घेतली.
माझा अंदाज बरोबर ठरला — एक अतिशय सुंदर हिम घुबडाची मादी डॉकवरील एका छोट्या इमारतीच्या छपरावर बसली होती. माझा आनंद शब्दांत मावण्यासारखा नव्हता. मी काही फोटो काढले, पण मी मोनोपॉड लावून व्हिडिओ काढेपर्यंत ती उडून गेली. आता ती तिच्या नेहमीच् या ठिकाणी म्हणजे horseshoe पियरच्या टोकावर जाऊन बसली होती. माझे हात गोठायला लागले होते, म्हणून मी हातमोजे घातले आणि हँड वॉर्मर वापरून हात नॉर्मलला आणले.

पियर सुमारे अर्धा किलोमीटर लेकच्या आत शिरलेले होते. -1C° तापमान, जोरदार वारा आणि अशा प्रचंड थंडीत कॅमेऱ्याचे सामान घेऊन चालणे खूप कठीण जात होते. शेवटी आम्ही पियरच्या टोकाशी पोहोचलो. घुबडापासून योग्य अंतर ठेऊन मी कॅमेरा सेट केला आणि घुबडाची निरीक्षणे घेऊ लागले.
ते शांत आणि झोपाळू दिसत होते. त्याचे जेवण पण छान झालेले असावे कारण त्याने ‘पेलट कास्टिंग’ करताना मी पाहिले — म्हणजे घुबड आपल्या अन्नातील न पचलेले भाग, जसे की केस आणि हाडे, बाहेर टाकते.
ते फोटो मधे स्पष्ट दिसत आहे.

थोडा वेळ निरीक्षण केल्यानंतर लक्षात आले की घुबड फोटोशूटच्या मूडमध्ये नाही. त्याला झोप अनावर झाली होती. म्हणून त्याला जास्ती अडथळा न आणता परत जाण्याचे ठरवले. थंडी मुळे गारठून गेल्यामुळे कारमधे बसूनच काही वेळ हीटर चालू ठेऊन आम्ही आधी नॉर्मल ला आलो. नंतर उरलेला दिवस जीवाचे शिकागो केले. शिकागो डाउनटाउन, क्लाऊड गेट (“द बीन”) आणि स्कायडेक असे जेवढे शक्य होईल तेवढे फिरून घेतले आणि नंतर हॉटेल वर परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले तर छान ऊन पडले होते. काही तास तरी बर्फवृष्टी होणार नव्हती म्हणून आम्ही पुन्हा एकदा मॉन्ट्रोज पॉईंटला जायचे ठरवले.


साधारण दुपारचे 12 वाजले होते. घुबड पियर वरच असेल असा अंदाज बांधून आम्ही पियरकडे चालू लागलो, पण काही बर्डर्सनी सांगितले की घुबड पार्किंगच्या जवळच येऊन बसले आहे. आम्ही परत फिरलो. दूर एका वॉशरूमच्या छपरावर ते बसलेले दिसले. अनेक फोटोग्राफर्स आणि बर्डवॉचर्स आधीच तिथे होते. मी पण तिथे जाऊन मला पाहिजे तसा angle घेऊन कॅमेरा सेट केला, पण पुन्हा तेच — घुबड झोपाळलेले होते. अधून मधून जांभई देतानाचे काही फोटो मिळाले. थोडा वेळ तिथे घालवून आम्ही घरी परत जाण्याचा निर्णय घेतला कारण आता स्नो स्टॉर्म ची वॉर्निंग शिकागो साठी होती.
स्नोई आऊल विषयी माहिती
Habitat: स्नोई आऊल मुख्यतः आर्क्टिक टुंद्रामध्ये प्रजनन करतात. कॅनडा, अलास्का आणि इतर उत्तर ध्रुवीय प्रदेशातील झाडांविरहित विस्तीर्ण भागात ते वास्तव्य करतात.
Migration: आर्क्टिकमधील अन्न कमी झाली की अनेक घुबडे अन्नाच्या शोधात दक्षिणेकडे शेकडो किंवा हजारो मैल प्रवास करतात. शोअर लाईन्स आणि ओपन जागा ते जास्ती पसंत करतात.
Appearance: पांढऱ्या शुभ्र आणि काळ्या ठिपक्यांसह ते खूप आकर्षक दिसतात. डोळे चमकदार आणि पिवळ्यारंगाचे असतात.
Diet: हिवाळ्यात ते छोटे सस्तन प्राणी, पाणपक्षी किंवा इतर पक्ष्यांची शिकार करतात — विशेषतः सरोवरांच्या किनारी किंवा उघड्या भागात जे उपलब्ध असेल ते.
Behavior: बहुतेक घुबडांपेक्षा वेगळे असते. स्नोई आऊल बहुतांश वेळा दिवसा सक्रिय असतात, त्यामुळे ते सहजपणे पियर किंवा किनाऱ्यावर दिसू शकतात.
Adaptability: मूळचे आर्क्टिक मधले असूनही, ते समुद्रकिनारे, टेकड्या, बंदरे, शेतं आणि अगदी शहरी वॉटरफ्रंटवरही सहज जुळवून घेतात.
स्नोई आऊलला पाहण्याचा आणि त्याची काही निरीक्षणे डॉक्युमेंट करण्याचा माझा हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता.
अश्विनी कड

