नमस्कार प्रियजनहो,
आपल्या मंडळात येऊन मला या वर्षी २ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सर्वांसारखीच, मजल दरमजल करत आलोय आणि मी आपल्या क्लिवलंड मध्ये स्थिरावलोय. २०२३ च्या दिवाळी महोत्सवाला मी पहिल्यांदा आलो आणि आपल्या सर्वांशी भेट झाली. तसा मला क्लिवलंड मधे येऊन दीड वर्षाचा काळ उलटला होता, पण आपल्या मंडळाबद्दल मला माहितीच नव्हती. पण त्या दिवाळीत मात्र, बाहेर कितीही थंडी असली, तरी मला या, नुकत्याच भेटलेल्या माणसांकडून एक गरजेची उब मिळत होती. आणि उत्कर्षने कदाचित तेव्हा मला आणि माझ्या मनाला योग्य हेरलं आणि आपल्या NEOMM परिवारात सामील करून घेतलं. आपण सर्वांनीही मला इतक्या सहजरीत्या आपल्यात सामावून घेतलं, की मला मी 'माझ्या' माणसांसोबत आहे, याची शाश्वती मिळाली.
त्यानंतर अनेकानेक सण, सोहळे, नाटकं आणि आपल्या सुवर्णमहोत्सवी, खूप सुंदर पार पडलेल्या BMM मैत्रिमेळाव्याच्या अवर्णनीय अनुभवानंतर माझा हा इथला NEOMM परिवार, खरा परिवार तर झालाच होता, पण एकदा डोळे मिटून, मागे पाहून, विचार केल्यावर, त्याची शाश्वतीही मिळाली. त्यासाठी आपल्या सर्वांचे अनेक धन्यवाद. आपल्याला प्रियजन उगीच नाही म्हणालो. 😊🙏
देवाची कृपा आणि आईवडिलांचे आशीर्वाद आहेत, ज्यामुळेच मी माझे विचार शब्दात उतरवू शकतो. आणि आपल्याकडे असे अनेक कलाकार आहेत, ज्यातल्या काहींचे लेख या अंकात मी प्रकाशित करीत आहे.
माझी आशा आहे की आपल्या सर्वांस हा अंक आवडेल, आणि आपल्या पुढील अंकासाठी आपल्या NEOMM परिवारातल्या सगळ्या कलाकारांकडून, संपूर्ण इंद्रधनुष्यच नाही तर त्यातल्या सगळ्या अनेकानेक छटांचेही प्रदर्शन व्हावे😊🙏🏻
रंग शोधा, आपले मन शोधा,
त्या रंगात आपला प्रतिदिन शोधा,
रंग गंध शोधता,
स्वतःतला नटरंग शोधा...😊🙏🙏🙏

